सोलापूर : शाळांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याने जन्म प्रमाणपत्रासाठी नागरिकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाला भेट देत कामकाजाचा आढावा घेतला. नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि आवश्यक कागदपत्रे वेळेत उपलब्ध व्हावीत, यासाठी त्यांनी प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या.
जून महिन्यात शाळा सुरू होत असल्याने जन्म प्रमाणपत्रासाठी मोठ्या प्रमाणात पालक आणि नागरिक कार्यालयात येत असतात. या पार्श्वभूमीवर कार्यालयातील सेवा, कर्मचारी व्यवस्था आणि नागरिकांच्या सुविधांची पाहणी करून उपमहापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच कार्यालयातील अडचणी जाणून घेत नागरिकांना अधिक सुलभ आणि जलद सेवा देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती घेतली.
जन्म प्रमाणपत्रासाठी येणाऱ्या नागरिकांना विनाकारण प्रतीक्षा करावी लागू नये, अर्जांचा वेळेत निपटारा व्हावा आणि सेवा वितरणात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या. शाळा प्रवेशाच्या महत्त्वाच्या कालावधीत प्रशासनाने अधिक समन्वयाने काम करून नागरिकांची गैरसोय टाळावी, असेही त्यांनी सांगितले.
या पाहणी दौऱ्यावेळी नगरसेवक किसन जाधव, नगरसेवक मेटरे, मंडल अध्यक्ष महेश देवकर, शिवराज गायकवाड आदी उपस्थित होते. नागरिकाभिमुख प्रशासनाच्या दृष्टीने महापालिकेने सेवा अधिक परिणामकारक आणि गतिमान करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, अशी अपेक्षा व्यक्त करत उपमहापौरांनी संबंधित विभागाला आवश्यक दक्षता घेण्याचे आदेश दिले.
Post Views: 13