बार्शी – भटके-विमुक्त समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तसेच भारतीय संविधानाने दिलेल्या मूलभूत हक्क व अधिकारांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने सुरू असलेली ‘मुशाफिरी यात्रा’ गुरुवार दि. ११ जून रोजी सोलापूर व धाराशिव जिल्ह्यात दाखल झाली.
यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात बार्शी शहरातील कैकाडी, मदारी, पारधी, भिल्ल, वडार, नाथपंथी गोसावी, जोशी, वासुदेव, वैदू आदी भटके-विमुक्त समाजाच्या पालांवर व तांड्यांवर जाऊन जनजागृती करण्यात आली.
समाजातील शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक व राजकीय प्रश्न सोडवण्यासाठी तसेच भटके-विमुक्त समाजाची अचूक लोकसंख्या शासनाच्या नोंदीत यावी यासाठी घरगणना आणि जनगणना करणे ही काळाची गरज असल्याचा संदेश या यात्रेद्वारे देण्यात येत आहे.
सभेला मार्गदर्शन करताना भटके-विमुक्त समाजाचे नेते डॉ. अरुण जाधव म्हणाले की, “देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या रक्ताचा सडा सांडणाऱ्या आणि इंग्रजांविरुद्ध संघर्ष करणाऱ्या भटके-विमुक्त समाजाच्या माथी इंग्रजांनी गुन्हेगारीचा शिक्का मारला. स्वातंत्र्य मिळून ७८ वर्षे उलटून गेली तरी हा कलंक पूर्णपणे पुसला गेला नाही, हे या समाजाचे दुर्दैव आहे.”
ते पुढे म्हणाले की, आजही भटके-विमुक्त समाजातील अनेक कुटुंबे जंगलात, डोंगरदऱ्यांमध्ये किंवा गावाबाहेर पाल उभारून राहत आहेत. शिक्षण, आरोग्य, निवारा, वीज, नागरिकत्वाचे दाखले यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी त्यांना संघर्ष करावा लागत आहे.
“जोपर्यंत भटके-विमुक्त समाज मुख्य प्रवाहात येत नाही आणि त्यांची सर्वांगीण प्रगती होत नाही, तोपर्यंत देश खऱ्या अर्थाने महासत्ता होऊ शकत नाही.
कार्यक्रमात मुशाफिरी यात्रेचे समन्वयक प्रा. संतोष चव्हाण, नागनाथ अडसूळ, मनीष देशपांडे आणि स्वाती ठोंगे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ऋषी गायकवाड, जाकीर तांबोळी, राजेंद्र कुलकर्णी, आनंद चव्हाण, रूक्षराज वैद्य, पठाण हैदर, राहुल चव्हाण यांच्यासह भटके-विमुक्त समाजातील बांधव उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. तुकाराम शिंदे यांनी केले.