
सोलापूर – संतांच्या समागमामुळे माणसाला योग्य विचार आणि सन्मार्गाची प्राप्ती होते. संतांच्या संगतीत आल्यावर परमात्म्याच्या प्राप्तीपर्यंत जाता येते. संतांच्या संगतीत उद्धार आणि मोकारांच्या संगतीत पतन होते असे सांगतानाच दुर्जनाचं साधं दर्शन जरी झालं तरी ते आपल्या जीवनात घातक आहे असे विचार देहू येथील श्री.गाथा मंदिराचे अध्यक्ष ह.भ.प.पांडुरंग महाराज घुले यांनी व्यक्त केले.
दमाणी नगरातील गड दर्शन समाज मंदिरात ह.भ.प.माऊली महाराज बचुटे – सवाळकर शिष्य – मित्र परिवाराच्यावतीने किर्तन महोत्सव सुरु आहे.शनिवारी रात्री झालेल्या किर्तनात पांडुरंग महाराज घुले यांनी संतांच्या सहवासामुळे आपल्याला जीवनाचे खरे उद्दिष्ट समजते ,आणि भगवंताच्या बाबतीत नितांत श्रद्धा व गोडी निर्माण होते .नामस्मरण कधीही सुटू देऊ नका, मुखाने विठ्ठलाचा जयघोष आणि गजर करत रहा, जीवनाचे सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही असे सांगितले.
संतांच्या संगतीत आपलं जीवन भले होतं, असे संत तुकाराम महाराज सांगतात .चांगले आचार आणि विचार घडण्यासाठी संतांची संगत आवश्यक आहे. संतांच समागमन घडले पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात संतांचे समागमन घडले तर ते उपयोगालाच येणार आहेत. योग्य सतपुरुषाच्या संगतीत आले पाहिजे. संताच्या संगतीत आल्यावर अयोग्य व्यक्तीसुद्धा योग्य पद्धतीने आचरणात येतो ही ताकद संतांमध्ये आहे. सर्व सुखं संतांच्या संगतीत प्राप्त होतील.


















