सोलापूर : शहरातील मुस्लीम वस्ती भागातील धार्मिक स्थळांचा विकास, कब्रस्तानांची सुधारणा आणि ड्रेनेज व्यवस्थेचे आधुनिकीकरण करण्यासाठी विशेष निधी मंजूर करावा, या मागणीचे निवेदन शाब्दि सोशल अँड वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष फारुख शाब्दी यांनी महापौर विनायक कोंड्याल आणि स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शहरातील मुस्लीम वस्ती भागात मोठ्या प्रमाणात नागरिक वास्तव्यास असून, या परिसरात मूलभूत नागरी सुविधांचा अभाव जाणवत आहे. अनेक धार्मिक स्थळे, कब्रस्तान आणि जुनी ड्रेनेज व्यवस्था यामुळे स्वच्छता, आरोग्य व सुरक्षिततेचे प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळे या भागांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष निधीची आवश्यकता आहे. शाहजहूर दर्ग्याच्या विकासासाठी एक कोटी रुपये, मल्ला शाह वली दर्ग्यासाठी ७५ लाख रुपये, जडजडा आणि मोदी कब्रस्तानांसाठी प्रत्येकी ७५ लाख रुपये, तर नवी जिंदगी कब्रस्तानासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच परिसरातील सध्याची सहा इंच क्षमतेची जुनी ड्रेनेज लाईन बदलून १८ इंच क्षमतेची आधुनिक ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. ही विकासकामे पूर्ण झाल्यास परिसरातील नागरिकांना स्वच्छता, आरोग्य आणि सार्वजनिक सुविधांचा अधिक चांगला लाभ मिळेल. तसेच या भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावून शहराच्या विकासाला सकारात्मक चालना मिळेल,असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी राजा बागवान, कोमारो सय्यद, रियाज खरादी, अजहर शेख, याकुब शेख, शोएब खलिफा, बशीर शेख, महिबुब अली कुरेशी, जुबेर कुरेशी, रियाज बागवान आणि सुलतान शेख आदी उपस्थित होते.
Post Views: 13