मुंबई – राज्यातील आयटीआय कर्मचाऱ्यांच्या विविध न्याय्य व प्रलंबित मागण्यांबाबत माजी आमदार संजय केनेकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
राज्यातील आयटीआय कर्मचाऱ्यांच्या विभागीय बदली, अभावित सेवेचे लाभ, कोपा गट निदेशक सेवा ज्येष्ठता, पदोन्नती, तासिका कंत्राटी पीपीपी एम्प्लॉयबिलीटी स्किल निदेशक यांना कायम करणे, आपसात विशेष विनंती बदली या महत्त्वाच्या प्रश्नांवरही सकारात्मक चर्चा झाली. कौशल्य विकास व तांत्रिक शिक्षण क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी या मागण्यांवर शासन स्तरावर लवकर निर्णय घेण्याची विनंती करण्यात आली.
याप्रसंगी आमदार संजय केनेकर यांनी शिक्षण, कौशल्य विकास आणि कर्मचाऱ्यांच्या हक्कांशी संबंधित प्रश्नांबाबत आपण कायम कटिबद्ध असल्याचे सांगितले. संबंधित सर्व घटकांना न्याय मिळावा यासाठी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आयटीआय कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे प्रधान सचिव व संचालक यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्याची मागणी करण्याचे निवेदन विविध कर्मचारी संघटना यांच्या प्रतिनिधी यांनी माजी आमदार केनेकर यांच्या नेतृत्वात दिले. यावर कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी तात्काळ सर्व मुद्द्यांची माहिती मागवून बैठक घेण्याचे निर्देश दिले.
राज्यातील कौशल्य विकास व्यवस्थेचा कणा असलेल्या आयटीआय कर्मचाऱ्यांच्या मागण्या न्याय्य असून त्यावर शासनाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा प्रतिनिधी मंडळाने व्यक्त केली. या सर्व मागण्या मार्गी लावण्यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असून, संबंधित कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या प्रसंगी अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाचे सदस्य डॉ. किरण झरकर, अजय देशपांडे, सविता सावंत, श्रीपाद कुलकर्णी, राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे सखाराम जगताप, कास्टस्ट्राइबचे डॉ. विलास जोंधळे तसेच नवनियुक्त कर्मचारी प्राजक्ता काथार उपस्थित होते. आयटीआय कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर लवकरच सकारात्मक निर्णय होईल, अशी आशा यावेळी व्यक्त करण्यात आली.