सोलापूर : तळे हिप्परगा येथील ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयात भारत सरकारच्या उच्च शिक्षण मंत्रालय आणि आयुष मंत्रालयाच्या निर्देशानुसार ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर महाविद्यालयात विशेष योग सत्राचे (Yoga Session) आयोजन करण्यात आले होते.
या सत्राला योगशिक्षक प्रा. अजित कलागते आणि क्रीडा मार्गदर्शक प्रा. सचिन गायकवाड यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. मार्गदर्शन करताना प्रा. कलागते यांनी बदलती जीवनशैली, ताणतणावाचे व्यवस्थापन आणि योगाचे महत्त्व यावर प्रकाश टाकला. “शास्त्रशुद्ध योगासने सातत्याने केल्यास शारीरिक आणि मानसिक विकासामध्ये सकारात्मक बदल निश्चितपणे दिसून येतात, त्यामुळे प्रत्येकाने दैनंदिन जीवनात योगाचा अंगीकार करावा,” असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस. एस. मेहता आणि उपप्राचार्य डॉ. विनायक पत्की यांच्या हस्ते योग मार्गदर्शक प्रा. अजित कलागते यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला सर्व विभागांचे प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. एस. आर. निरंतर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रीडा समन्वयक प्रा. एस. जमादार, प्रा. ऋचा श्रीराम, वामन पवार, प्रमोद लिगाडे आणि दादा पांगळे यांच्यासह सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


















