बार्शी – शहरातील सुभाषनगर, रिंग रोडजवळील सरकाळे हॉटेल येथे एका निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यावर बिअरच्या बाटलीने हल्ला करुन गंभीर जखमी केल्याची घटना सोमवार दि. २२ जून रोजी घडली. याप्रकरणी चारजणांविरोधात बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीमंत लक्ष्मण देवकर (वय ६७, रा. सुभाषनगर, आगळगाव रोड, बार्शी) हे सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी असून ते आपल्या मित्रांसमवेत सरकाळे हॉटेल येथे थांबले होते. यावेळी त्यांचे मित्र अनिल गंभीरे व मदन मुंढे यांच्यासह ते शीतपेय घेत असताना सोनू हाजगुडे, पेशा रणझुंझारे व त्यांचे अन्य दोन साथीदार तेथे आले.
फिर्यादीनुसार देवकर यांनी ओळखीपोटी संबंधितांना बसण्यास सांगितले असता त्यातून वाद निर्माण झाला. यानंतर आरोपींनी शिवीगाळ करत देवकर यांना हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर सोनू हाजगुडे याने हॉटेलमधील रिकामी बिअरची बाटली उचलून देवकर यांच्या डोक्यात मारल्याने ते जखमी झाले. त्यानंतर घरी जात असताना पुन्हा मागून येऊन त्यांच्या डोक्यात दुसरी बिअरची बाटली डोक्यात मारल्याचा उल्लेख फिर्यादीत करण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेनंतर सरकाळे हॉटेल परिसरातील कथित अवैध दारू विक्रीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मागील महिन्यातच जिल्हा पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा यांच्या आदेशानुसार बार्शी शहर व तालुक्यात अवैध व्यवसायांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली होती. त्याअंतर्गत सरकाळे हॉटेल येथे अवैध दारू विक्री व गुटखा विक्रीच्या तक्रारींवरुन छापा टाकण्यात आला होता. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल जप्त करुन गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मात्र, एवढी मोठी कारवाई होऊनही संबंधित ठिकाणी अवैध दारु विक्री सुरुच असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगत आहे. निवृत्त पोलीस अधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्यात घटनास्थळी बिअरच्या बाटलीचा वापर झाल्याच्या आरोपामुळे या चर्चेला आणखी बळ मिळाले आहे.
घटनेत जखमी झालेल्या अवस्थेत देवकर बार्शी शहर पोलीस ठाण्यात आल्यानंतर, यांच्या डोक्यातून रक्तस्राव झाल्याने त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. उपचारानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
या प्रकरणी सोनू हाजगुडे, पेशा रणझुंझारे व अन्य दोन अज्ञात साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बार्शी शहर पोलीस करत आहेत.
Post Views: 19