
सोलापूर – आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी करण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा व विविध विकासकामांची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पंढरपूर व वाखरी परिसराचा दौरा केला. पालखी मार्ग, पालखी विसावा स्थळे, मुक्काम व्यवस्था तसेच विविध विभागांच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. या दौऱ्यात जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, जिल्हा परिषदेचे अधिकारी, उपाध्यक्षांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. मात्र, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य यांनाच निमंत्रण देण्यात आले नसल्याची बाब समोर आल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा संस्थेचा सर्वोच्च लोकप्रतिनिधी असताना त्यांना वारी नियोजनाच्या महत्त्वाच्या पाहणी दौऱ्यापासून दूर ठेवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमार्फत वारीसाठी मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असताना संबंधित संस्थेच्या अध्यक्षांनाच निमंत्रण न देणे हे प्रशासनातील समन्वयाच्या अभावाचे द्योतक असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
वारीसारख्या राज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या सोहळ्याच्या नियोजनात लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात सुसंवाद व समन्वय अपेक्षित असताना अध्यक्षांनाच वगळण्यात आल्याने प्रशासनाच्या नियोजनावर टीका होत आहे. हा केवळ संवादाचा अभाव आहे की जाणीवपूर्वक डावलण्याचा प्रकार, याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. आगामी काळात अशा महत्त्वाच्या बैठका आणि पाहणी दौऱ्यांमध्ये सर्व संबंधित लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन प्रशासनाने काम करावे, अशी मागणी व्यक्त होत आहे.
चौकट
अध्यक्ष दीपक वैद्य यांनी पत्रकारांशी बोलताना, “मला कोणताही निरोप किंवा निमंत्रण मिळाले नाही. सन्मानाने बोलावले असते तर मी निश्चितच उपस्थित राहिलो असतो. निमंत्रणच नसल्यामुळे मी जिल्हा परिषदेतच थांबलो,” असे स्पष्ट सांगितले.






















