सोलापूर : सोलापूरच्या एन. बी. नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा आपला ठसा उमटवला आहे. महाविद्यालयाच्या यांत्रिकी अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थिनी प्रांजल सतीश शिंदे आणि विद्यार्थी ऋतुराज प्रभाकर कावडे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करत मुंबई येथील राजभवनात आयोजित पश्चिम बंगाल राज्य स्थापना दिन कार्यक्रमात प्रभावी सांस्कृतिक सादरीकरण करून मानाचा गौरव मिळविला.
केंद्र शासनाच्या ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत २० जून २०२६ रोजी मुंबई राजभवनात पश्चिम बंगाल राज्य स्थापना दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात देशाच्या सांस्कृतिक विविधतेचे दर्शन घडविण्यात आले. यावेळी प्रांजल शिंदे आणि ऋतुराज कावडे यांनी पश्चिम बंगालच्या सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक असलेले ‘हे लो गिरी शोनलो खबोर’ हे बंगाली गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
हा कार्यक्रम महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाने प्रभावित होऊन राज्यपालांनी त्यांचे विशेष कौतुक केले. विविध राज्यांच्या संस्कृतींचा अभ्यास करून केलेले हे सादरीकरण राष्ट्रीय एकात्मतेचे उत्तम उदाहरण असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमातील उल्लेखनीय सहभागाबद्दल विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या प्रमाणपत्रावर महाराष्ट्र राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांची स्वाक्षरी असून हा सन्मान त्यांच्या शैक्षणिक व सांस्कृतिक प्रवासातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या यशाबद्दल संस्थेचे सहसचिव तथा सोलापूर केगाव कॅम्पसचे संचालक संजय नवले, प्राचार्य डॉ शंकर नवले, उपप्राचार्य डॉ. रवींद्र व्यवहारे, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
प्रांजल शिंदे आणि ऋतुराज कावडे यांच्या या उल्लेखनीय यशामुळे एन. बी. नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ तसेच संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचा नावलौकिक उंचावला आहे. राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमांमधील सातत्यपूर्ण सहभाग, संशोधन क्षेत्रातील कामगिरी आणि आता राजभवनातील सांस्कृतिक सादरीकरणामुळे विद्यार्थ्यांसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे. राज्यपालांकडून मिळालेली दाद आणि राजभवनात उमटविलेला सांस्कृतिक ठसा ही सोलापूरच्या शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.
Post Views: 12