सोलापूर – शहरातील अवंती नगर (फेज १ आणि २), अरविंद धाम आणि यश नगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून विजेचा मोठा लपंडाव सुरू असून, दुसरीकडे महावितरणकडून आलेल्या अव्वाच्या सव्वा बिलांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
गेल्या १५ जूनपासून या भागातील वीजपुरवठा दिवसातून दोन ते तीन वेळा, तर रात्रीच्या वेळी दोन वेळा किमान अर्धा ते एक तासासाठी खंडित होत आहे. सोलापुरातील सध्याचा प्रचंड उकाडा आणि त्यातच सातत्याने जाणारी वीज यामुळे लहान मुले, वृद्ध आणि नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत.
एकीकडे नियमित वीजपुरवठा मिळत नसताना, दुसरीकडे ग्राहकांना मिळालेली मागील दोन महिन्यांची लाईट बिले ही जानेवारी-फेब्रुवारी महिन्यांच्या तुलनेत तब्बल तीन ते चार पटीने अधिक आली आहेत. अचानक बिलांमध्ये झालेल्या या भरमसाठ वाढीमुळे नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. या अवाजवी बिलवाढीबाबत आणि वीज खंडित होण्याबाबत महावितरणकडे चौकशी केली असता, विजेच्या तारांना आडवी येणारी झाडे तोडण्यासाठी तसेच डीपीवरील अतिताणामुळे वीजपुरवठा खंडित होत असल्याचे कारण पुढे केले जात आहे.
परंतु, ही समस्या गेल्या आठवडाभरापासून सातत्याने भेडसावत असून महावितरणने यावर कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. नियमित पैसे भरूनही ग्राहकांना योग्य सेवा मिळत नसल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. महावितरणने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ वीजपुरवठा सुरळीत करावा आणि बिलांमधील त्रुटी दूर कराव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. या परिस्थितीत लवकर सुधारणा न झाल्यास सर्व नागरिक एकत्रित येऊन महावितरण कार्यालयावर तीव्र मोर्चा काढणार असल्याचा इशाराही परिसरातील संतप्त नागरिकांनी दिला आहे.






















