बार्शी – तालुक्यासह सोलापूर, धाराशीव आणि लातूर जिल्ह्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि दळणवळणाला गती देणाऱ्या टेंभुर्णी – येडशी महामार्गाच्या चौपदरीकरणाचे (4-Lane) काम लवकरच प्रत्यक्षात उतरणार आहे. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या प्रकल्पाला मोठी गती मिळाली असून, याबाबतचा अधिकृत प्रस्ताव आता केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.
मुंबई येथील कोकण भवन येथे आज राष्ट्रीय महामार्ग विभागाचे सचिव श्री. संतोष शेलार आणि आमदार राजेंद्र राऊत यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत आमदार राऊत यांनी टेंभुर्णी-येडशी महामार्गाच्या चौपदरीकरणाचा सविस्तर प्रस्ताव केंद्र सरकारकडे (दिल्ली) त्वरित रवाना करण्यासाठी सचिव शेलार यांच्याकडे सुपूर्द केला.
या महामार्गाच्या रुंदीकरणामुळे सोलापूर आणि मराठवाड्याला जोडणारा एक प्रमुख दळणवळण मार्ग अधिक सक्षम होणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी लवकरच सकारात्मक निर्णय घेतील, असा विश्वास आमदार राजेंद्र राऊत यांनी व्यक्त केला आहे. या प्रकल्पाला लवकरच अंतिम प्रशासकीय मान्यता मिळून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असे संकेतही या बैठकीनंतर मिळाले आहेत.
टेंभुर्णी – येडशी हा मार्ग व्यापारी आणि प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. सध्या वाढत्या वाहतुकीमुळे या मार्गावर चौपदरीकरण करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. या महामार्गामुळे स्थानिक वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल आणि अपघातांचे प्रमाण कमी होईल. सोलापूर, धाराशीव आणि लातूर या तिन्ही जिल्ह्यांमधील व्यापारी संपर्क अधिक वेगाने वाढेल. प्रवाशांचा वेळ आणि इंधन दोन्हीची मोठी बचत होणार आहे.
टेंभुर्णी-येडशी महामार्गाचे चौपदरीकरण हा संपूर्ण मतदारसंघाच्या आणि शेजारील जिल्ह्यांच्या विकासाचा कणा ठरणार आहे. या कामासाठी आमचा सातत्याने पाठपुरावा सुरु होता. आज सचिव शेलारांसोबत झालेल्या सकारात्मक बैठकीमुळे केंद्र सरकारकडून याला लवकरच प्रशासकीय मान्यता मिळेल आणि या महामार्गाचे काम सुरू होईल. अशी आशा आमदार राजेंद्र राऊत यांनी व्यक्त केली.
Post Views: 7