बार्शी – एम. आय. टी. व्ही. जी. एस. स्कूल, बार्शी येथे राष्ट्रीय डॉक्टर्स डे निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. डॉक्टरांच्या समाजातील अनमोल योगदानाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये आदर, कृतज्ञता आणि आरोग्याविषयी जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात विशेष परिपाठाने झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी आरोग्य व मानवतेवर आधारित प्रतिज्ञा सादर केली. विद्यार्थ्यांनी ‘समाजातील डॉक्टरांची भूमिका’ या विषयावर प्रभावी मनोगत व्यक्त करुन डॉक्टरांच्या सेवाभावी कार्याचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच डॉक्टरांच्या निस्वार्थ सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. निनाद दोशी (अस्थिरोग तज्ज्ञ), डॉ. स्नेहा घेवारे (स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ), डॉ. स्नेहल दोशी (सर्वसाधारण वैद्य व मधुमेहतज्ज्ञ), डॉ. मिलिंद पाटील (पॅथॉलॉजिस्ट) आणि डॉ. मयुरी पाटील (पॅथॉलॉजिस्ट) यांचा शाळेच्यावतीने सत्कार करण्यात आला. यानंतर सर्व डॉक्टरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या विविध आरोग्यविषयक शंकांचे निरसन केले.
तसेच मानस हॉस्पिटल, बार्शी येथील समुपदेशक व मानसोपचारतज्ज्ञ डॉ. कविता बिनवाडे यांनी इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनींसाठी भावनिक आरोग्य, आत्मविश्वास, सकारात्मक विचारसरणी, मासिक पाळी आणि वैयक्तिक स्वच्छता या विषयांवर मार्गदर्शनपर परिसंवाद घेतला. विद्यार्थिनींनी या सत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. याचबरोबर इयत्ता नर्सरी ते दुसरीच्या विद्यार्थ्यांनी डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त करत स्वतः तयार केलेली शुभेच्छापत्रे सर्व डॉक्टरांना भेट म्हणून दिली.
कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करण्याचे, डॉक्टरांच्या सेवाभावी कार्यातून प्रेरणा घेऊन समाजसेवेची भावना जोपासण्याचे आवाहन केले.
Post Views: 41