वैराग – पोलिसांच्या प्रतिमेस मलिन करण्यासाठी चुकीची माहिती पसरवून समाजमाध्यमांवर खोट्या बातम्या प्रसारित केल्याप्रकरणी वैराग पोलीस ठाण्यात एका महिलेसह दोन वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार जराचंद हरिदास काळेल यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.
काय आहे नेमकी घटना?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १:०० वाजेच्या सुमारास सौ. सुवर्णा बबन डोलारे (रा. रातंजन, ता. बार्शी) यांनी वैराग शहरात अंगावर महापुरुषांच्या फोटोचे पोस्टर लावून आणि हातात प्लेट घेऊन दुकानदारांकडून पैसे गोळा करत ‘भिक मांगो’ आंदोलन केले होते. प्रत्यक्षात पोलिसांनी कोणाही व्यक्तीकडे पैशाची मागणी केली नसताना किंवा कोणालाही मारहाण केली नसतानाही, या महिलेने जाणीवपूर्वक पोलीस दलाची बदनामी करण्याचा घाट घातला.
पत्रकारांवरही कारवाईचा बडगा
आंदोलनकर्त्या महिलेने ‘माझा न्यूज’ आणि ‘न्यूज लोकवार्ता ११’ या वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींना चुकीची माहिती दिली. “वैराग पोलीस ठाण्यातील हवालदार काळेल हे गोरगरिबांकडे ५० हजार रुपयांची मागणी करतात आणि पैसे न दिल्यास मारहाण करतात,” असे खोटे व असभ्य भाषेत कथन करून तिने लोकांची दिशाभूल केली.
विशेष म्हणजे, सदर घटनेची कोणतीही खात्री न करता ‘माझा न्यूज’ आणि ‘न्यूज लोकवार्ता ११’ या दोन वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींनी जनमानसात पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर जाणीवपूर्वक प्रसारित व व्हायरल केला.
गुन्हा दाखल कलमे:
याप्रकरणी वैराग पोलीस ठाण्यातगु.र.नं. ४०१/२०२६ नुसार खालील कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे:
* भारतीय न्याय संहिता (BNS): कलम ३५६, ३५२, २२४, २१७, ३(५)
* इतर कायदे: क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ७(१)(A)
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक (PSI) जाधव हे करीत आहेत. समाजमाध्यमांवर बेजबाबदारपणे खोटी माहिती पसरवणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याने बार्शी तालुक्यात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.