सोलापूर – इंडियन मॉडेल इंटरनॅशनल स्कूलतर्फे महिला पालकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘इंडियन मॉडेल महिला पॅरेंट्स बॉक्स क्रिकेट लीग सीझन २’स्पर्धेत ‘पॉवर मॉम’ संघाने ‘रायझिंग स्टार मॉम’ संघावर १२ धावांनी मात करून विजेतेपद पटकावले.
अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आयएमएस पॉवर मॉम संघाने ७ षटकांत २ बाद ५० धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल आयएमएस रायझिंग स्टार मॉम संघाला ७ षटकांत २ बाद ३८ धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे आयएमएस पॉवर मॉम संघाने १२ धावांनी शानदार विजय मिळविला.
या स्पर्धेत अस्मिता अंबुरे यांनी सामनावीर आणि मालिकावीर हे दोन्ही महत्त्वाचे पुरस्कार पटकावले. याशिवाय उत्कृष्ट फलंदाज म्हणून पायल कोठारी, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून जयश्री रुग्गे आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून अश्विनी देगावकर यांना सन्मानित करण्यात आले.
स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ शाळेचे सचिव अमोल जोशी, श्री साई महिला प्रतिष्ठानच्या सचिव सायली जोशी, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, एस.के. डेव्हलपर्सचे संजय कुलकर्णी व अमृता कुलकर्णी, मुख्याध्यापिका अपर्णा कुलकर्णी तसेच मानसी जोशी, ममता बसवंती, आदिती कुलकर्णी, सुजाता बुट्टे, रुही काझी, अचला राचर्ला आणि अक्षय्या कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
या स्पर्धेचे पंच म्हणून अजय चाबुकस्वार आणि राजकुमार माने यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन आरती काजळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन अक्षय माने यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडाशिक्षक सचिन ढवाण, अक्षय माने, राजकुमार माने, अजय चाबुकस्वार, वैष्णवी गडदे तसेच आयएमएस शाळेतील सर्व कर्मचारी आणि पालकांचे सहकार्य लाभले.























