सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेतील विविध विभागांतील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने निर्णय व्हावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आनंद (m चंदनशिवे यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. संबंधित विषयांचा अहवाल मागवून विधानसभेत अधिकाऱ्यांची बैठक बोलावून योग्य निर्णय घेण्याची मागणी त्यांनी केली.
चंदनशिवे यांनी निवेदनात मनपा कर्मचाऱ्यांशी संबंधित सात महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत. लाड-पागे समितीअंतर्गत प्रलंबित नियुक्त्या तातडीने करण्यात याव्यात, सफाई कामगारांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार सरळसेवा भरतीऐवजी लाड-पागे समितीच्या माध्यमातून नियुक्त्या द्याव्यात. बुधवार पेठ येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सफाई कामगार वसाहत आणि सात रस्ता परिसरातील धोकादायक झालेल्या निवासस्थानांच्या जागी डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेअंतर्गत नवीन घरे उभारण्यात यावीत. महानगरपालिकेच्या रिक्त जागांवर सफाई कामगारांसाठी शासनाच्या योजनेतून पक्की घरे बांधण्यात यावीत. सफाई कामगारांच्या रक्ताच्या नात्यातील नातसून, पणतू, पणतूसून, भाचा-भाची यांनाही लाड-पागे समितीअंतर्गत नामनिर्देशक व्यक्ती किंवा सांभाळकर्ता म्हणून लाभ मिळावा, प्रशासन काळात मोठ्या पदांवर झालेल्या नियुक्त्यांचा अहवाल जाहीर करावा, सफाई कामगारांच्या दैनंदिन कामकाजाची नियमावली उपलब्ध करून द्यावी आणि महानगरपालिकेच्या विविध विभागांत कंत्राटी पद्धतीने कार्यरत कर्मचाऱ्यांची व संबंधित मक्तेदारांची संपूर्ण माहिती जाहीर करावी, अशाही मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.
सोलापूर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर शासन स्तरावर सकारात्मक निर्णय व्हावा आणि कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा, या उद्देशाने संबंधित विभागांचा अहवाल मागवून विधानसभेत अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करावी, अशी मागणी आनंद चंदनशिवे यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांच्याकडे केली.
Post Views: 19