सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेतील पदोन्नतीने सहायक आयुक्त व उपायुक्त पदावर नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांचा धर्मवीर शहर व शहर हद्दवाढ कर्मचारी संघटनेच्या वतीने महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावंकर, उपायुक्त सोनाली यादव, सामान्य प्रशासन विभागाचे अधीक्षक रजाक पेंढारी यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. या समारंभात सहायक आयुक्तपदी नियुक्त झालेल्या युवराज गाडेकर व विनोद कुलकर्णी, उपायुक्तपदी नियुक्त झालेले गिरीश पंडित तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात सहायक आयुक्तपदी नियुक्त झालेले आशिष लोकरे यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी महापौर विनायक कोंड्याल यांनी नव्या जबाबदारीबद्दल सर्व अधिकाऱ्यांचे अभिनंदन करताना, लोकाभिमुख प्रशासन उभारण्यासाठी प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि लोकहिताला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे सांगितले. सर्व अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करून नागरिकांना दर्जेदार व वेळेत सेवा उपलब्ध करून द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी नियुक्त अधिकाऱ्यांना शुभेच्छा देत प्रशासनातील कार्यक्षमता, शिस्त आणि लोकाभिमुख सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी संघभावनेने काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली.नव्या जबाबदारीची यशस्वी वाटचाल करण्यासाठी शुभेच्छा देत प्रशासन अधिक लोकाभिमुख व गतिमान करण्याचे आवाहन उपमहापौर देवकर आणि सभागृह नेते काळे यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी अंतर्गत लेखापरीक्षक राहुल कुलकर्णी यांनी प्रास्ताविक करून सत्कार समारंभामागील उद्देश स्पष्ट केला तर सूत्रसंचालन गुरुलिंग पुजारी यांनी केले. धर्मवीर शहर व शहर हद्दवाढ कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मल्लिकार्जुन हुणजे व विशाल माने यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी दिलीप देशमुख, अमोल पवार, सुभाष सुरवसे, रवी बिद्री, मल्लिनाथ उटगी, अशोक बिराजदार, सरसंबी उपरे, देडे, अस्वरे, वीरेश स्वामी, मुनाफ इनामदार तसेच महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी आणि कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
————
Post Views: 17