पंढरपूर – शहरातील बुरुड गल्ली व गडशी गल्ली परिसरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून, भाजप नगरसेविका प्रतीक्षा विक्रम शिरसट व नगरसेवक संदीप अधटराव यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मागील काही काळापासून या परिसरातील विकासकामे रखडली होती. पिण्याच्या पाण्याच्या समस्येमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. स्थानिक नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेऊन भाजपचे माजी शहराध्यक्ष विक्रम शिरसट यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करत हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले.
उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर नगरपालिकेच्या टँकरद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात विक्रम शिरसट यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, नगरसेविका प्रतीक्षा शिरसट, नगरसेवक संदीप अधटराव आणि भाजपचे माजी शहराध्यक्ष विक्रम शिरसट यांच्या पाठपुराव्यामुळे या भागात नवीन पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन टाकण्यात आली.
या नव्या पाइपलाइनमुळे बुरुड गल्ली व गडशी गल्ली परिसरातील नागरिकांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागल्याचे चित्र असून, नागरिकांनी समाधान व्यक्त करत लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे आभार मानले आहेत.
नवीन पाणीपुरवठा सुरू झाल्याने या भागातील नागरिकांना नियमित व पुरेशा प्रमाणात पिण्याचे पाणी उपलब्ध होणार असून, परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Post Views: 7