
सोलापूर : येथील नू. म. वि. शिशु शाळा आणि श्री शुभराय महाराज मठ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दिनांक ४ जुलै रोजी ‘शिशु शाळा विचार मंच’ अंतर्गत एका विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यशाळेची सुरुवात शाळेच्या संगीत शिक्षिका अलका ओक यांच्या प्रार्थनेने झाली. यानंतर मा. शुभांगी बुवा यांनी प्रास्ताविकातून विचार मंच या उपक्रमाचे महत्त्व आणि उद्दिष्टे स्पष्ट केली.

या कार्यशाळेत एकूण तीन अभ्यासपूर्ण सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या सत्रात सर्वोदय शिक्षण संस्थेच्या शिक्षिका सौ. सानिका भोसेकर यांनी ‘शिशु शाळेतील शिक्षिकेची जबाबदारी’ या विषयावर मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात शरदचंद्र पवार शाळेच्या शिक्षिकांनी बडबड गीत आणि गोष्ट सादर केली. तसेच श्राविका शाळेतील शिक्षिका कीर्ती माने व मयुरी सोनटक्के यांनी लहान मुलांसाठी गोष्ट सांगून अभिनय गीत घेतले. या सत्रात एस. बी. शाळेतील शिक्षकांनीही सुंदर अभिनय सादर केले. तिसऱ्या सत्रात सर्वोदय शिक्षण संस्थेतील शिक्षिका सुष्मिता आचार्य यांनी ‘शिशु शाळेतील जीवन व्यवहार’ हा विषय घेऊन प्रत्यक्ष पाठ (प्रात्यक्षिक) घेऊन दाखविला.
सर्व सत्रांचा आढावा घेत शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतातून या विषयांचे बालशिक्षणातील महत्त्व व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन स्नेहा गजेंद्रगडकर यांनी केले. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी शाळेच्या सर्व शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

















