सोलापूर : प्रभाग क्रमांक १५ मधील नागरी समस्यांची प्रत्यक्ष पाहणी करत सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी रेल्वे लाईन परिसरातील भाजी मार्केट, नाल्याची स्वच्छता, रामवाडी येथील गजानन महाराज पालखी मार्ग तसेच मनपा शाळा क्रमांक २५ येथे भेट देऊन संबंधित विभागांना तातडीने कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले.
नगरसेविका श्रीदेवी जॉन फुलारे यांच्या निवेदनानंतर झालेल्या या पाहणीत भाजी मार्केट परिसरात साचलेला कचरा, दुर्गंधी, अपुरी स्वच्छता व्यवस्था आणि महिला विक्रेत्यांसाठी स्वतंत्र शौचालयाचा अभाव आयुक्तांच्या निदर्शनास आला. मंडईलगतच्या नाल्याच्या संरक्षण भिंतीचे अनेक ठिकाणी नुकसान झाल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही उपस्थित झाला.
याची गंभीर दखल घेत आयुक्तांनी संपूर्ण भाजी मार्केट परिसर तातडीने स्वच्छ करून नियमित साफसफाई, निर्जंतुकीकरण आणि प्रभावी कचरा व्यवस्थापन राबविण्याचे निर्देश दिले. नाल्यालगत मजबूत संरक्षण भिंत उभारण्याचे कामही त्वरित सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
दंडवत महाराज मठाजवळील पुलाच्या दोन्ही बाजूंनी लोकवस्ती असल्याने नाल्यात मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असल्याची बाब समोर आल्यानंतर, या ठिकाणी जाळी अथवा संरक्षक भिंत उभारून कचरा टाकण्यास प्रतिबंध केला जाईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.यानंतर रामवाडी येथील गजानन महाराज पालखी मार्गावरील जुन्या बंद पोलीस ठाण्याची जीर्ण संरक्षण भिंत पाहून आयुक्तांनी तातडीने दुरुस्तीचे आदेश दिले. आगामी पालखी सोहळ्यात हजारो भाविक या मार्गाने जाणार असल्याने दुरुस्तीला विलंब झाल्यास भिंतीसमोर बॅरिकेड्स उभारून सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या सूचनाही दिल्या.
भाजी मार्केटमधील महिला विक्रेत्यांसाठी स्वतंत्र शौचालयासह आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सकारात्मक कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
या पाहणीवेळी नगरसेवक विनोद भोसले, नागेश खरात, विजय कदम, नगर अभियंता सारिका आकुलवार, विभागीय अधिकारी विजय लोखंडे, सफाई अधीक्षक अनिल चराटे, प्रशासन अधिकारी मल्हारी माने, मुख्याध्यापक तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आयुक्तांनी घेतली विद्यार्थ्यांची चाचणी
दरम्यान, आयुक्तांनी मनपा शाळा क्रमांक २५ ला भेट देऊन शैक्षणिक गुणवत्तेचा आढावा घेत विद्यार्थ्यांची छोटेखानी चाचणीही घेतली. शासनाकडून प्राप्त सर्व शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना तातडीने वितरित करावे, तसेच शाळेच्या शेजारील मैदान कायम स्वच्छ ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले.
Post Views: 21