सोलापूर : समग्र शिक्षा अभियानांतर्गत कंत्राटी पद्धतीवर कार्यरत असताना निधन झालेल्या कै. सौदागर गोविंदराव वाघमारे यांच्या कुटुंबाच्या मदतीसाठी मनपा प्राथमिक शिक्षण मंडळातील अधिकारी, कर्मचारी आणि महानगरपालिकेच्या शाळांतील शिक्षकांनी पुढाकार घेत सुमारे पाच लाख रुपयांचा मदतनिधी सुपूर्द करून माणुसकीचा हात दिला.
समग्र शिक्षा अभियानांतर्गत विषय साधन व्यक्ती म्हणून कंत्राटी पद्धतीवर कार्यरत असलेले कै. सौदागर गोविंदराव वाघमारे यांचे दि. १६ मे २०२६ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.
कै. वाघमारे यांनी कंत्राटी सेवेत कार्यरत असतानाही अत्यंत प्रामाणिकपणे व समर्पित भावनेने काम केले. मर्यादित मानधनात काटकसरीने संसार सांभाळत त्यांनी आपल्या दोन्ही मुलींना वैद्यकीय शिक्षण देऊन डॉक्टर बनविले. मात्र, कंत्राटी सेवेमुळे त्यांच्या निधनानंतर शासनाकडून कोणत्याही प्रकारचे आर्थिक लाभ उपलब्ध नसल्याने त्यांच्या कुटुंबासमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या.
ही बाब लक्षात घेऊन मनपा प्राथमिक शिक्षण मंडळ, सोलापूर येथील प्रशासन अधिकारी मल्हारी माने
यांनी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच महानगरपालिकेच्या सर्व शाळांतील शिक्षकांना मदतीचे आवाहन केले. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत सुमारे पाच लाख रुपयांचा मदतनिधी संकलित करण्यात आला.
या निधी संकलन मोहिमेत समग्र शिक्षा अभियानातील सर्व विशेष विषय साधन व्यक्ती, विशेष शिक्षक तसेच अश्विनी लांबतुरे, केंद्रीय मुख्याध्यापक यांचे विशेष सहकार्य लाभले.संकलित मदतनिधी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, नियंत्रण अधिकारी शिक्षण विभाग तथा मुख्य लेखाधिकारी डॉ. रत्नराज जवळगेकर यांच्या हस्ते कै. सौदागर वाघमारे यांच्या कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आला.
यावेळी बोलताना आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत सांगितले की, संकटसमयी सहकाऱ्याच्या कुटुंबासाठी अधिकारी, कर्मचारी आणि शिक्षकांनी दाखविलेली संवेदनशीलता व सामाजिक बांधिलकी अनुकरणीय आहे. हा उपक्रम माणुसकी, सहकार्य आणि परस्पर विश्वास जपणारा असून समाजासाठी प्रेरणादायी आहे.
याप्रसंगी प्रशासन अधिकारी मल्हारी माने, पर्यवेक्षक
मनीष बांगर, रजनी राऊळ, सुरेश कासार, निलोफर सय्यद, सर्व पर्यवेक्षक, तसेच समग्र शिक्षा अभियानाचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी रियाज अत्तार, समन्वयक समावेशित शिक्षण अविनाश शिंदे, अमोल गायकवाड, ज्ञानेश्वर गरड, सुवर्णा गुरव, लक्ष्मण पुजारी, गुरुप्रसाद तलवार आदी उपस्थित होते.
Post Views: 18