पंढरपूर – पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनासंदर्भातील विविध प्रश्न आणि शंका जाणून घेण्यासाठी शिवसेना नेत्या व माजी उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी शनिवारी ऑनलाइन बैठक घेतली.या बैठकीत बाधितांनी पुनर्वसन प्रक्रियेतील अनिश्चितता, मोबदल्याबाबतची अस्पष्टता आणि उदरनिर्वाहाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले.या बैठकीला, पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समिती अध्यक्ष अभयसिंह कुलकर्णी इचगावकर, वैभव बडवे, सुनील उंबरे यांच्यासह अनेक प्रतिनिधी सहभागी झाले होते.
या बैठकीत कृती समितीच्या सदस्यांनी स्पष्ट केले की, २२ रस्त्यांचे रुंदीकरण करण्यास त्यांचा विरोध नसून ते नियोजनपूर्वक करण्यात यावे. मात्र, घर व दुकान जागेच्या बदल्यात नेमका कोणता मोबदला मिळणार, त्याचे स्वरूप काय असेल आणि पुनर्वसनाची अंमलबजावणी कशा पद्धतीने होणार, याबाबत प्रशासनाने अद्याप स्पष्ट भूमिका मांडलेली नसल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यामुळे जमीनमालकांना अधिकृतपणे संपूर्ण माहिती देण्याची मागणी करण्यात आली.
बाधितांनी सांगितले की, या विषयावर ४८६ नागरिकांचा मतप्रवाह जाणून घेण्यात आला असून त्यापैकी केवळ १५ जणांनी विद्यमान कोरिडॉरच्या प्रस्तावाला पाठिंबा दर्शविला तर १० जण तटस्थ राहिले. तर उर्वरित बाधितांनी कॉरिडॉरला विरोध दर्शविला होता. विकास कामांसाठी परिसरातील उपलब्ध शासकीय जागांची माहिती प्रशासनाला देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले..
यावेळी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेत पुनर्वसन प्रक्रियेत मूळ बाधितांचे हित अबाधित राहणे आवश्यक असल्याचे सांगितले. “बाधितांनी बिल्डरांना जागा विक्रीचे अधिकार दिल्यास आर्थिक लाभ त्यांच्याकडे जातो. त्यामुळे मूळ बाधितांनी कोणालाही सहजपणे जागा विक्री अधिकार देऊ नयेत. पुनर्वसनातून सर्वाधिक आर्थिक व सामाजिक लाभ मूळ नागरिकांनाच मिळाला पाहिजे,” असे डॉ.गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.
पंढरपूरातील बाधित कुटुंबांचा उदरनिर्वाह हा त्यांच्या राहत्या घराशी निगडित व धार्मिक व्यवसायावर आणि व्यापारावर अवलंबून असल्याचे नमूद करत, केवळ घराच्या बदल्यात घर किंवा दुकान देणे पुरेसे ठरणार नाही. पुनर्वसनासोबत त्यांच्या रोजगार आणि उपजीविकेचाही प्रश्न सोडविणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे डॉ.गोऱ्हे यांनी अधोरेखित केले.
नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, सरकार स्थानिकांना विश्वासात घेऊनच पुनर्वसनाचा निर्णय घेईल, असे आश्वासन देत डॉ. गोऱ्हे यांनी सर्व मुद्द्यांचा पाठपुरावा करून संबंधित प्रशासनाशी चर्चा करण्यात येईल, असे सांगितले. या ऑनलाइन बैठकीत कॉरिडॉर बाधित नागरिकांच्या प्रतिनिधिक समस्या नोंदविण्यात आल्या असून त्यावर पुढील स्तरावर पाठपुरावा करण्याची भूमिका डॉ.गोऱ्हे यांनी व्यक्त केली.
Post Views: 6