धाराशिव – शहरातील तांबरी विभागात आज सकाळी एक गाय चालत असताना खोल नालीत पडल्याची घटना घडली. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने धाराशिव नगरपालिकेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, अनेक वेळा फोन करूनही प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी नगरसेवक राहुल काकडे यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, राहुल काकडे यांनी “दहा मिनिटांत माणसं पाठवतो” असे आश्वासन दिले. मात्र, सुमारे दोन तास उलटूनही गेले तरी घटनास्थळी कुठलाच कर्मचारी ना कुठला माणूस पोचलेला नाही असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला.अखेर नागरिकांनी माजी नगरसेवक सोमनाथ (आप्पा) गुरव यांच्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच त्यांनी तात्काळ पुढाकार घेत अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांत जेसीबी घटनास्थळी पाठवली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने गायीची सुखरूप सुटका करण्यात आली. त्यामुळे एका मुक्या प्राण्याचा जीव वाचला.
या घटनेनंतर नगरपालिकेच्या कार्यपद्धतीवर नागरिकांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या तक्रारींना वेळेत प्रतिसाद मिळत नसेल, तर नगरपालिकेची यंत्रणा नेमकी कितपत कार्यरत आहे, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित करण्यात आला.नागरिकांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, शहरात विविध विकासकामे झाल्यानंतर त्याची प्रसिद्धी सोशल मीडियावरील रीलद्वारे मोठ्या प्रमाणावर केली जाते. मात्र, प्रत्यक्ष संकटाच्या वेळी मदतीसाठी संबंधित यंत्रणा वेळेत पोहोचत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. मुक्या प्राण्याच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाल्यानंतरही तातडीने मदत न मिळाल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत असल्याचे त्यांनी म्हटले.दरम्यान, कोणतेही पद नसतानाही तातडीने मदतीला धावून जाऊन गायीची सुखरूप सुटका करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल माजी नगरसेवक सोमनाथ गुरव यांच्या कार्याचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.करुनही