वैराग : लांबलेल्या पावसामुळे आणि अल निनोच्या पार्श्वभूमीवर जलसाठ्याचे नियोजन करण्यासाठी प्रशासनाने धरणांवरील वीज पुरवठा खंडित करण्याचे आदेश दिले होते. मात्र, शेतकऱ्यांची अडचण आणि पिकांची गरज लक्षात घेऊन सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी आज एक महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. जवळागाव, हिंगणी (पा) आणि एकरुख या मध्यम प्रकल्पांवरील कृषी पंपांचा विद्युत पुरवठा अत्यावश्यक सेवेसाठी दररोज ५ तास सुरू ठेवण्याचे थेट आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी महावितरणला दिले आहेत.
प्रशासनाने घेतलेल्या या सकारात्मक भूमिकेमुळे या परिसरातील शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
काय आहे पार्श्वभूमी?
सुरुवातीला पाटबंधारे प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठा जास्तीत जास्त दिवस पुरवण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मध्यम प्रकल्पांवरील कृषी पंपांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याचे आदेश (संदर्भ पत्र दि. १५.०६.२०२६ अन्वये) देण्यात आले होते. पाणी टंचाईच्या संकटामुळे प्रशासनाने हे पाऊल उचलले होते.
प्रशासनाने बदलला निर्णय; ५ तास वीज देण्याचे आदेश
कृषी पंपांची वीज खंडित झाल्यामुळे पिके जळण्याची भीती निर्माण झाली होती. यावर लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (सिंचन) उपअभियंता व सहाय्यक प्रशासक यांनी दि. १६ जुलै २०२६ रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे विनंती केली होती. शेतकऱ्यांची निकड आणि पिकांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी तात्काळ निर्णय बदलला. त्यानुसार, जवळागाव, हिंगणी (पा) आणि एकरुख या तिन्ही मध्यम प्रकल्पांवरील कृषी पंपांना अत्यावश्यक सेवेअंतर्गत दररोज ५ तास वीज पुरवठा सुरू ठेवण्याचे आदेश आज (दि. १७ जुलै) महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना देण्यात आले आहेत.
जलसंपदा विभागाशी समन्वय ठेवून कारवाईचे निर्देश हा ५ तासांचा वीज पुरवठा सुरळीत ठेवताना सोलापूरच्या जलसंपदा विभागाशी योग्य तो समन्वय साधून पुढील योग्य ती कार्यवाही करावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात स्पष्ट केले आहे. या आदेशाची प्रत कार्यकारी अभियंता, सोलापूर पाटबंधारे विभाग यांनाही माहिती व आवश्यक कार्यवाहीसाठी पाठवण्यात आली आहे.
या निर्णयामुळे या तिन्ही मध्यम प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पिकांसाठी पाणी उपसणे शक्य होणार असून, ऐन टंचाईच्या काळात पिकांना संजीवनी मिळणार आहे.