बार्शी – तालुक्याच्या विकासकामांना नव्याने गती मिळण्याची चिन्हे निर्माण झाली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बार्शी तालुक्याच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याची स्पष्ट ग्वाही दिली आहे. आमदार राजाभाऊ राऊत यांनी मुंबई येथील वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तालुक्यातील विविध प्रलंबित, मंजूर तसेच प्रगतीपथावरील विकासकामांसाठी आवश्यक निधीची मागणी केली.
या भेटीदरम्यान आमदार राजाभाऊ राऊत यांनी बार्शी तालुक्यातील विविध विकासकामांचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला. गेल्या दीड वर्षांपासून निधीअभावी रखडलेल्या विकासकामांना गती देण्यासाठी तसेच मंजूर योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्याची विनंती त्यांनी केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, ‘राजाभाऊ, काळजी करु नका, बार्शी तालुक्याला निधीची कमतरता पडणार नाही,’ असे आश्वासन दिले. मुख्यमंत्र्यांच्या या शब्दांमुळे बार्शी तालुक्यातील रखडलेल्या विकासकामांचा बॅकलॉग भरुन निघण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
तालुक्यातील रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य, सिंचन, उद्योग तसेच इतर पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध झाल्यास अनेक महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लागणार आहेत. त्यामुळे नागरिकांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांनाही न्याय मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Post Views: 6