कपाळावर बुक्क्याचा टिळा, हातात टाळ-मृदंग, डोक्यावर तुळशी वृंदावन आणि मुखात “जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल” चा जयघोष… अशा अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात उमाबाई श्राविका विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आषाढी एकादशीचे औचित्य साधून भव्य ‘वारकरी दिंडी’ सोहळा पार पडला. या दिंडीने संपूर्ण परिसर विठ्ठलमय करून टाकला.
सर्वप्रथम संपूर्ण देशाचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून करून दिंडीला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी प्रशालेच्या मुख्याध्यापिका अश्विनी पंडित, उपमुख्याध्यापिका माधवी खोत, मार्गदर्शिका दीप्ती शहा व पर्यवेक्षक बाळासाहेब पौळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
मूर्ती पूजनानंतर प्रशालेच्या प्रांगणातून शहरातील मुख्य रस्त्यांवरून दिंडी रॅली काढण्यात आली.
विद्यार्थ्यांनी कपाळावर बुक्का, गळ्यात माळा व हातात टाळ घेऊन पांढरा शुभ्र पोशाख परिधान केला होता, तर विद्यार्थिनींनी आकर्षक वेशभूषा करत हातात आणि डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन वारीत सहभाग घेतला.
अनेक विद्यार्थ्यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणीसह विविध संतांच्या हुबेहूब वेशभूषा साकारून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
हातात टाळ-मृदंग घेऊन अभंग आणि गवळणी गात विठुरायाचा गजर करत विद्यार्थ्यांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
प्रशालेचे कलाशिक्षक प्रवीण कंदले यांनी रेखाटलेले विठ्ठलाचे अत्यंत सुंदर व रेखीव चित्र या दिंडीचे मुख्य आकर्षण ठरले.
नगरप्रदक्षिणेनंतर दिंडीचे प्रशालेत आगमन झाले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने प्रांगणात ‘रिंगण’ घातले. शिक्षक व विद्यार्थ्यांनी यावेळी पावली तसेच फुगड्या देखील खेळल्या.विद्यार्थ्यांचा उत्साह आणि विठ्ठलभक्ती पाहून उपस्थित थक्क झाले. यानंतर सहशिक्षिका पल्लवी खांडवे व सोनाली उंडे यांनी सादर केलेल्या विविध अभंग आणि भजनांनी संपूर्ण वातावरण अधिकच भक्तिमय बनवले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख अनुप कस्तुरे, जयश्री आगरखेड, प्रीती वऱ्हाडे, सुहास छंचुरे, अभिजीत पाटील, मीनाक्षी बेळळे, प्रियंका जैन यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
Post Views: 29