सोलापूर : दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या कथित पोलिस लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने गुरुवारी पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला सोलापुरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरातून काढण्यात आलेल्या तिरडी मोर्चा, जोरदार घोषणाबाजी, कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा लिलाव बंद आणि काही प्रमुख बाजारपेठांतील दुकाने बंद राहिल्याने आंदोलनाचा प्रभाव स्पष्टपणे जाणवला.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आवाहनानुसार आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनाचे नेतृत्व माजी नगरसेवक रवी गायकवाड यांनी केले. सकाळपासून वंचितचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते बाळीवेस, चाटी गल्ली, मधला मारुती, माणिक चौक, नवी पेठ, सराफ कट्टा, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात फिरून व्यापारी व नागरिकांना स्वेच्छेने बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करत होते.
छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालेला निषेध मोर्चा बाळीवेस, टिळक चौक, मधला मारुती, मेकॅनिक चौक, दत्ता चौक, नवी पेठ आणि सरस्वती चौक मार्गे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पोहोचला. मोर्चादरम्यान केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची तिरडी खांद्यावर घेऊन निषेध करण्यात आला. “धर्मेंद्र प्रधान हाय हाय” तसेच विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ घोषणांनी परिसर दणाणून गेला.
आंदोलनाला सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील माथाडी कामगारांनी जाहीर पाठिंबा दिल्याने कांद्याचे लिलाव पूर्णपणे बंद ठेवण्यात आले. नवी पेठ, सराफ बाजार, मधला मारुती, टिळक चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील अनेक व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवली. ग्रामीण भागातील काही एसटी बसफेऱ्यांवरही बंदचा परिणाम दिसून आला.
या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे, जिल्हा महासचिव अनिरुद्ध वाघमारे, रवी गायकवाड, विनोद इंगळे, सुहास कदम, सचिन गायकवाड यांच्यासह पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या आणि मोठ्या संख्येने समर्थक सहभागी झाले. शहरातील वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. युवा पॅंथरचे संस्थापक आतिश बनसोडे, चंद्रकांत सुरवसे यांच्यासह अनेक युवकही तिरडी मोर्चात सहभागी झाले.
दरम्यान, बंदच्या पार्श्वभूमीवर शहर व जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. संवेदनशील भागांत अतिरिक्त पोलिस फौज तैनात करण्यात आली होती. दिवसभर कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत
आंदोलन सुरूच : आतिश बनसोडे
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा युवा पॅंथरचे संस्थापक आतिश बनसोडे यांनी दिला. विद्यार्थ्यांवरील कथित लाठीहल्ल्याचा निषेध अधिक तीव्र करण्यात येणार असून राज्यभर व्यापक आंदोलने छेडली जातील. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.
विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे
दुर्लक्ष नको : रवी गायकवाड
केंद्र सरकारने विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याऐवजी त्यांच्यावर कथित लाठीमार झाल्याच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आल्याचे माजी नगरसेवक रवी गायकवाड यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष न करता त्यांच्याशी सकारात्मक चर्चा करावी, अशी मागणी त्यांनी केली.
—–
Post Views: 16