सोलापूर : ‘विठ्ठल विठ्ठल’ च्या गजरात आज महानगरपालिका मुलांची मराठी केंद्रशाळा क्रमांक ४ चे परिसर भक्तीमय झाले. निमित्त होते आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या पालखी सोहळ्याचे. मात्र, यावर्षीच्या पालखीचे मुख्य आकर्षण होते सायकलवर निघालेले लाडके विठ्ठल-रुक्मिणी!
दरवर्षीप्रमाणे यंदाही शाळेत आषाढी एकादशीनिमित्त दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. शाळेतील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. विठ्ठल आणि रुक्मिणीच्या वेशभूषेत सजलेले दोन चिमुकले विद्यार्थी एका सजवलेल्या सायकलवर आरूढ झाले होते. या अनोख्या ‘सायकल दिंडी’ ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आधुनिक काळात पर्यावरण रक्षणाचा संदेश देत ही संकल्पना राबवण्यात आली, अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिली.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांची ओळख होण्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचे महत्त्वही समजण्यास मदत झाली. शाळेच्या आवारातून निघालेली ही दिंडी पाहण्यासाठी पालकांनी आणि परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. संपूर्ण वातावरण विठ्ठलमय झाले होते.
हा अनोखा आणि सर्जनशील उपक्रम महापालिका शाळेत राबवल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी शाळेचे आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
Post Views: 14