बार्शी – शहर पोलिसांनी अवैध गुटखा विक्रीविरोधात मोठी कारवाई करत महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला रुपये २७,९८० किमतीचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला असून, या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली श्री भगवंत चौक परिसरात करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक गणेश कुंभार हे त्यांच्या पथकासह श्री भगवंत रथ मार्गावर गस्त घालत असताना, सहाय्यक पोलीस फौजदार अजित वरपे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, बी.आय.टी. कॉलेज चौक बायपास रोड परिसरात एक इसम प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी घेऊन येणार आहे.
माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सापळा रचला. यावेळी संशयित इसम तीन पिशव्यांमध्ये गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ घेऊन आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव अविनाश बबन शिंदे (वय ४२, रा. कुसळंब, ता. बार्शी, जि. सोलापूर) असे सांगितले.
पंचांसमक्ष तीन पिशव्यांची तपासणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेले विविध ब्रँडचे गुटखा, पानमसाला व सुगंधी तंबाखू असा एकूण रुपये २७,९८० किमतीचा मुद्देमाल आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या मालामध्ये एम सुगंधी तंबाखू, बाबा तंबाखू, बाबा पानमसाला, डायरेक्टर पानमसाला तसेच इतर तंबाखूजन्य पदार्थांचा समावेश आहे.
या प्रकरणी पोलीस अंमलदार कदर तांबोळी यांच्या फिर्यादीवरुन बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५८०/२०२६ नोंद करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २२३, २७४, २७५, १२३ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ मधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत पोलीस निरीक्षक गणेश कुंभार, सपोनि सुनील धनवटे, सपोफौ अजित वरपे, पो.कॉ. कदर तांबोळी, पो.कॉ. सचिन देशमुख तसेच चालक पो.कॉ. मरठे यांनी सहभाग घेतला.
Post Views: 12