सोलापूर – सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने ग्रामीण आरोग्य सेवेच्या गुणवत्तेत ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन (एनक्यूएएस) सुरू झाल्यापासून प्रथमच जिल्हा परिषदेच्या तीन आयुष्मान आरोग्य मंदिरांना राष्ट्रीय गुणवत्ता मानांकन मिळाले आहे. या यशामुळे सोलापूरच्या ग्रामीण आरोग्य सेवेला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली असून, जिल्हा परिषदेच्या आरोग्य व्यवस्थेचा नवा आदर्श निर्माण झाला आहे.
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य संस्थांमधील रुग्णसेवा, स्वच्छता, रुग्ण सुरक्षा, औषध व उपकरण व्यवस्थापन, सेवा वितरण, नोंदवही व्यवस्थापन तसेच रुग्णकेंद्रित सुविधांचे कठोर निकषांवर मूल्यांकन केले जाते. या सर्व निकषांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्थांनाच राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन प्रदान करण्यात येते.
यंदाच्या मूल्यांकनात दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती येथील आयुष्मान आरोग्य मंदिराला ८४.३१ टक्के, मोहोळ तालुक्यातील येवती येथील आयुष्मान आरोग्य मंदिराला ८३.७३ टक्के, तर औंधी येथील आयुष्मान आरोग्य मंदिराला ८२.०० टक्के गुण मिळाले. या तिन्ही आरोग्य मंदिरांनी राष्ट्रीय गुणवत्ता मानांकन प्राप्त करून जिल्ह्याच्या नावलौकिकात भर घातली आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषद, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय आणि महानगरपालिका आरोग्य विभागातील विविध संस्थांपैकी केवळ जिल्हा परिषद आरोग्य विभागालाच हे मानांकन मिळाले आहे.
या मानांकनामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच अधिक सुरक्षित, दर्जेदार, विश्वासार्ह आणि रुग्णकेंद्रित आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहेत. तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मानांकन प्राप्त संस्थांना गुणवत्ता प्रोत्साहन निधी मिळणार असून, त्यातून आरोग्य केंद्रांमध्ये आधुनिक वैद्यकीय उपकरणे, पायाभूत सुविधा आणि रुग्ण सुविधांचा अधिक विकास करता येणार आहे.
या यशामागे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे प्रभावी नेतृत्व, नियोजन आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा महत्त्वाचा ठरला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नंदकिशोर घाडगे, सहायक संचालक डॉ. मोहन शेगर, जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. हर्षल जाधव, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी (सीएचओ), आरोग्य कर्मचारी आणि आशा स्वयंसेविका यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हे यश साकार झाले.
कोट
या ऐतिहासिक कामगिरीमुळे सोलापूर जिल्हा परिषदेने ग्रामीण आरोग्य सेवेच्या गुणवत्तेचा नवा मापदंड निर्माण केला असून, राज्यातील इतर जिल्ह्यांसाठीही आदर्श उभा केला आहे.
– कुशल जैन, मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर जिल्हा परिषद
Post Views: 10