पंढरपूर – श्रीक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी वारी २०२६ मध्ये सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने सुरक्षेसोबतच गर्दी व्यवस्थापनात एक ऐतिहासिक आणि अत्याधुनिक टप्पा गाठला आहे. सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली यंदाच्या वारीत सेंटियंट लॉजिक्स या तंत्रज्ञान संस्थेच्या मदतीने अत्याधुनिक ‘कॉग्निटिव्ह व्हिज्युअल ह्युमन न्यूरल एआय’ तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर करण्यात आला. या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने २४ ते २६ जुलै दरम्यान पंढरपुरात दाखल झालेल्या ३१ लाख ९८ हजार १२९ (सुमारे ३२ लाख) भाविकांची अचूक नोंद करण्यात आली आहे.
—————–
चौकट : ( तीन दिवसांतील वारकरी आगमनाची अचूक आकडेवारी )
एआय प्रणालीने केलेल्या अचूक मोजणीनुसार तीन दिवसांत पंढरपुरात आलेले भाविक : २४ जुलै २०२६ रोजी ६ लाख ७५ हजार २७४ वारकरी. २५ जुलै २०२६ (आषाढी एकादशी) रोजी १८ लाख ९६ हजार ५७३ वारकरी आणि २६ जुलै रोजी ६ लाख २६ हजार २८२ वारकरी. असे एकूण मिळून ३१ लाख ९८ हजार १२९ वारकरी भाविकांची नोंद करण्यात आली. आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजेच दि.२५ जुलै रोजी सर्वाधिक सुमारे १९ लाख वारकऱ्यांनी पंढरपुरात प्रवेश केल्याचे या नोंदीवरून स्पष्ट झाले आहे.
—————–
चौकट : ( दुबार मोजणी टाळणारे आधुनिक एआय तंत्रज्ञान )
पारंपरिक कॅमेरा पद्धतीमध्ये एकच व्यक्ती विविध कॅमेऱ्यांसमोर आल्यास आकडेवारी फुगण्याची शक्यता असते. मात्र, सोलापूर ग्रामीण पोलिसांनी वापरलेल्या एआय प्रणालीने ही दुबार नोंद पूर्णपणे टाळली. मुख्य प्रवेशद्वारांवर एआय आयडेंटिटी: सरगम चौक ते इंदिरा गांधी चौक, तीन रस्ता ते दगडी पूल, गोपाळपूर पूल, सावरकर चौक व मिलिटरी हॉस्टेल आणि सांगोला चौक एन्ट्री चा पाचवा मुख्य मार्गांवर खास एआय कॅमेरे बसवण्यात आले होते. व्यक्तीचा चेहरा, कपड्यांचा रंग आणि टोप्यांचा ताळमेळ लावून प्रत्येक वारकऱ्याची एक ‘युनिक एआय ओळख’ तयार केली जात होती.
क्रॉस-कॅमेरा ट्रॅकिंग व पुनर्प्रवेश पडताळणी: वारकरी शहरात फिरताना इतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी त्यांना न मोजता एकाच ओळखीने ट्रॅक केले. तसेच शहराबाहेर जाऊन पुन्हा प्रवेश करणाऱ्या भाविकांची जुन्या नोंदीशी पडताळणी करून दुबार मोजणी रोखण्यात आली.
—————–
चौकट : ( नागरिकांच्या गोपनीयतेचे तंतोतंत पालन )
या मोजणीदरम्यान भाविकांच्या गोपनीयतेची पूर्ण दक्षता घेण्यात आली. भारताचा *’डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन अॅक्ट’ (डीपीडीपी) आणि जीडीपीआर नियमावलीचे तंतोतंत पालन करण्यात आले असून, कोणत्याही व्यक्तीचा फोटो किंवा वैयक्तिक माहिती सर्व्हरवर सेव्ह करण्यात आलेली नाही.
“पंढरपूर आषाढी वारी हा जगातील सर्वात मोठ्या धार्मिक सोहळ्यांपैकी एक आहे. लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि योग्य नियोजनासाठी गर्दीचा अचूक अंदाज असणे अत्यंत आवश्यक असते. पारंपरिक पद्धतीं मधील त्रुटी दूर करून यंदा सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने एआय तंत्रज्ञानाचा वापर करून सुमारे ३२ लाख युनिक भाविकांची अचूक नोंद केली आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा भविष्यातील गर्दी व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर होईल असे जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितले.
Post Views: 6