पंढरपूर – आदिशक्ती श्री संत मुक्ताईंच्या ३१८ व्या आषाढी वारी पालखी सोहळ्यानिमित्त पंढरपूर येथील दत्त घाटावरील मुक्ताई मठात सोमवारी (दि.२७) पारंपरिक धार्मिक विधी भक्तिमय वातावरणात पार पडले. आषाढी एकादशीनंतर दरवर्षीप्रमाणे यंदाही संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानने बहीण संत मुक्ताबाईंना साडी-चोळी अर्पण करण्याचा मानाचा कार्यक्रम संपन्न झाला.
वारकरी परंपरेतील हा धार्मिक सोहळा अनेक वर्षांपासून अखंडपणे जपला जात आहे. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त आणि संत मुक्ताई संस्थानचे विश्वस्त यांच्या उपस्थितीत हा विधी मोठ्या श्रद्धा, भक्ती आणि पारंपरिक पद्धतीने पार पडला. यावेळी दत्त घाटावरील मुक्ताई मठात वारकरी, भाविक आणि सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याच दिवशी मुक्ताई मठात विशाल महाराज खोले यांचे कीर्तन रंगले. हरिनामाच्या गजरात आणि संत वाङ्मयाच्या निरुपणातून उपस्थित वारकरी भाविकांना आध्यात्मिक मार्गदर्शन लाभले. कीर्तनानंतर मठातील भक्तिमय वातावरण अधिकच भारावून गेले.
———————-
चौकट : (पालखीचा २९ जुलै रोजी परतीचा प्रवास )
दरम्यान, गुरु पौर्णिमेच्या दिवशी २९ जुलै रोजी गोपाळपुरा येथे पालखी सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे यांचे पारंपरिक काल्याचे कीर्तन होणार आहे. या धार्मिक कार्यक्रमानंतर संत मुक्ताई पालखीचा परतवारीचा प्रवास मुक्ताईनगरच्या दिशेने सुरू होणार आहे. सध्या त्याची तयारी येथील मठात सुरू आहे.
———————
चौकट : ( परतीचा प्रवास असेल २० दिवसांचा )
संत मुक्ताई पालखीची परतवारी सुमारे २० दिवसांची असेल. १७ ऑगस्टला पालखी सायंकाळी मुक्ताईनगर येथील नवीन संत मुक्ताई मंदिरात दाखल होईल. त्यानंतर १८ ऑगस्ट रोजी पालखी आगमन सोहळा साजरा करण्यात येणार आहे.
———————
चौकट : (२८ दिवस ६०० किमीचा प्रवास करुन होते यात्रेत सहभागी )
तब्बल सहा जिल्ह्यातून २८ दिवस ६०० किमी प्रवास करून पंढरपूरमध्ये दाखल होणारा संत मुक्ताईंचा पालखी सोहळा आषाढी वारीचे प्रमुख आकर्षण असतो. मानाच्या पालख्यापैकी सर्वांत आधी हा सोहळा पंढरपूरमध्ये दाखल होत असतो.
——————–
Post Views: 11