सोलापूर – सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांवर वाढत्या वीजबिलांचा बोजा कमी करून ग्रामपंचायतींना आर्थिक दिलासा देण्याबरोबरच नागरिकांना अखंडित पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
जिल्ह्यातील नऊ ग्रामपंचायतींमध्ये सौरऊर्जेवर आधारित पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी ५७ लाख ५० हजार रुपयांच्या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हा प्रायोगिक उपक्रम यशस्वी ठरल्यास जिल्ह्यातील इतर गावांमध्येही सौरऊर्जेवर आधारित पाणीपुरवठा योजना राबविण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
सध्या अनेक ग्रामपंचायतींना वाढत्या वीजबिलांचा फटका बसत असून थकीत देयकांमुळे पाणीपुरवठा योजनांच्या संचालनात वारंवार अडथळे निर्माण होत आहेत. परिणामी ग्रामीण भागातील नागरिकांना नियमित पाणीपुरवठ्याचा त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येवर दीर्घकालीन उपाय म्हणून सामाजिक परिवर्तन फाउंडेशनच्या माध्यमातून सौर ग्रीड प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या पहिल्या टप्प्यात मोहोळ तालुक्यातील मिरी, देगाव व अर्जुनसोंड, दक्षिण सोलापूर तालुक्यातील मद्रे, विंचूर व बक्षीहिप्परगा, तसेच उत्तर सोलापूर तालुक्यातील नरोटेवाडी, पाथरी व नंदूर या नऊ गावांतील पाणीपुरवठा योजना सौरऊर्जेवर चालविण्यात येणार आहेत. सौरऊर्जेच्या वापरामुळे वीजबिलाचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार असून योजनांचे संचालन अधिक सक्षम आणि शाश्वत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या प्रकल्पासाठी इच्छुक कंत्राटदारांकडून १ ऑगस्टपर्यंत निविदा स्वीकारण्यात येणार असून ३ ऑगस्ट रोजी निविदा उघडण्यात येतील. त्यानंतर तातडीने कामाला सुरुवात केली जाणार आहे.
चौकट
ग्रामीण भागात पाणीपुरवठा ही अत्यावश्यक सेवा अधिक सक्षम करण्यासाठी सौरऊर्जेचा वापर हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. पर्यावरणपूरक ऊर्जा, वीजबिलात बचत आणि अखंडित पाणीपुरवठा या तिन्ही उद्दिष्टांची सांगड घालणारा हा उपक्रम यशस्वी ठरल्यास जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींसाठी तो आदर्श ठरू शकतो. त्यामुळे ग्रामीण पाणीपुरवठा व्यवस्थेला स्वयंपूर्ण आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दिशेने जिल्हा परिषदेकडून उचललेले हे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.