सोलापूर – जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली असली, तरी ग्रामीण भागातील पाणीटंचाई अद्याप कायम असल्याचे वास्तव समोर आले आहे. जिल्ह्यातील ३२ गावांमध्ये सध्या ३३ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात असून, सुमारे ७५ हजार ५१८ नागरिकांना या व्यवस्थेवर अवलंबून राहावे लागत आहे. पावसाळ्यातही टँकरची गरज भासत असल्याने जलस्रोतांचे पुनर्भरण आणि दीर्घकालीन जलव्यवस्थापनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या माहितीनुसार, अक्कलकोट तालुक्यात ४, बार्शीमध्ये १, करमाळ्यात ६, माढ्यात ७, माळशिरसमध्ये ४, उत्तर सोलापूरमध्ये ५, दक्षिण सोलापूरमध्ये ३ आणि सांगोला तालुक्यात ६ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. विशेष म्हणजे मंगळवेढा, पंढरपूर आणि मोहोळ या तालुक्यांमध्ये सध्या कोणत्याही गावाला टँकरची आवश्यकता भासलेली नाही.
ऐन पावसाळ्यातही अनेक गावांतील विहिरी, बोअरवेल आणि पारंपरिक जलस्रोत पूर्ण क्षमतेने भरले नसल्याने प्रशासनाला टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू ठेवावा लागत आहे. दुष्काळी पट्ट्यातील गावांमध्ये ही समस्या अधिक गंभीर असून, सुरक्षित पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना टँकरवरच विसंबून राहावे लागत आहे.
जलतज्ज्ञांच्या मते, दरवर्षी उद्भवणाऱ्या या परिस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी जलसंधारण, पर्जन्यजल साठवण, शेततळी, नाला खोलीकरण आणि भूजल पुनर्भरणाच्या कामांना अधिक गती देण्याची आवश्यकता आहे. अन्यथा पावसाळ्यातही टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ कायम राहू शकते.
कोट
“सध्या जिल्ह्यातील ३२ गावांना ३३ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. पाणीपुरवठ्याचे नियोजन नियमितपणे केले जात असून, परिस्थितीचा सातत्याने आढावा घेऊन आवश्यकतेनुसार उपाययोजना केल्या जात आहेत.”
— प्रसाद काटकर, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद सोलापूर
Post Views: 9