धाराशिव – राज्याच्या CET प्रवेश परीक्षेच्या निकालानंतर काही विद्यार्थ्यांना बारावीच्या गुणांच्या तुलनेत अत्यंत उच्च पर्सेंटाइल मिळाल्याने विविध स्तरांवर चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर टक्केवारी (Percentage) आणि पर्सेंटाइल (Percentile) या दोन संकल्पनांमधील मूलभूत फरक समजून घेणे आवश्यक असल्याचे शिक्षण क्षेत्रातील जाणकारांनी स्पष्ट केले आहे.
टक्केवारी म्हणजे विद्यार्थ्याने एकूण गुणांपैकी किती गुण मिळवले, याचे प्रमाण होय. तर पर्सेंटाइल म्हणजे त्या विद्यार्थ्याने त्याच परीक्षेला बसलेल्या इतर सर्व विद्यार्थ्यांच्या तुलनेत किती चांगली कामगिरी केली, याचे मोजमाप. त्यामुळे टक्केवारी आणि पर्सेंटाइल या दोन्ही गोष्टींची थेट तुलना करणे योग्य ठरत नाही.
सध्या चर्चेत असलेल्या प्रकरणांमध्ये सुमारे १,२०० विद्यार्थ्यांना बारावीच्या टक्केवारीच्या तुलनेत प्रवेश परीक्षेत अधिक पर्सेंटाइल मिळाल्याचे समोर आले आहे. मात्र, या आधारे कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी सखोल तपास आणि वस्तुनिष्ठ विश्लेषण आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. अपूर्ण माहितीच्या आधारे होणाऱ्या सार्वजनिक चर्चेमुळे संबंधित विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांवर मानसिक ताण निर्माण होण्याची शक्यता असल्याचीही चिंता व्यक्त केली जात आहे.तज्ज्ञांच्या मते, बोर्ड परीक्षा आणि JEE, CET यांसारख्या स्पर्धात्मक प्रवेश परीक्षांचे स्वरूप व उद्दिष्ट वेगवेगळे असते. बोर्ड परीक्षा अभ्यासक्रमातील ज्ञानाचे मूल्यमापन करते, तर प्रवेश परीक्षा विद्यार्थ्यांची विश्लेषणात्मक क्षमता, समस्या सोडवण्याचे कौशल्य, अभिक्षमता, वेग आणि स्पर्धात्मक वातावरणातील कामगिरी तपासते. त्यामुळे बारावीतील गुण आणि प्रवेश परीक्षेतील निकाल यामध्ये फरक दिसून येणे स्वाभाविक मानले जाते.कोटा, पुणे, नागपूर, दिल्ली यांसारख्या शहरांतील विशेष कोचिंग संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची JEE आणि CET अशा विविध स्पर्धात्मक परीक्षांमध्ये सातत्यपूर्ण चांगली कामगिरी दिसून येते.
यंदा सुमारे १८ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून चर्चेत असलेली प्रकरणे एकूण परीक्षार्थ्यांच्या केवळ ०.००७ टक्क्यांपेक्षाही कमी असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे काही मोजक्या घटनांच्या आधारे संपूर्ण परीक्षा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यापेक्षा वस्तुस्थिती, आकडेवारी आणि अधिकृत तपास अहवालाची प्रतीक्षा करणे आवश्यक असल्याचे मत शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे.तज्ज्ञांच्या मते, टक्केवारी आणि पर्सेंटाइल यांतील फरक समजून घेतल्यास विद्यार्थी, पालक आणि नागरिक परीक्षा निकालांचा अधिक अचूक अर्थ लावू शकतील. तथ्यांवर आधारित चर्चा आणि पारदर्शक तपासणीमुळे स्पर्धात्मक परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास कायम राहण्यास मदत होईल.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...




















