सोलापूर : केवळ परीक्षेत अधिक गुण मिळविणे म्हणजेच गुणवत्ता नव्हे. बदलत्या काळात विविध कौशल्ये, तंत्रज्ञान आणि व्यक्तिमत्त्व विकास आत्मसात करूनच विद्यार्थी यशाच्या शिखरावर पोहोचू शकतात. ज्या क्षेत्रात जाल, तेथे आपल्या कर्तृत्वाने देशाचे नाव उज्ज्वल करा, असे आवाहन पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. महानवर यांनी केले.
कमांडो परिवार संचलित यशवंत शैक्षणिक समितीच्या वतीने धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक व मनोरमा परिवाराचे प्रमुख श्रीकांत मोरे होते.
अध्यक्षीय भाषणात श्रीकांत मोरे यांनी विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद आणि अहिल्याबाई होळकर यांच्या विचारांचे अनुकरण केल्यास ते आयुष्यभर मार्गदर्शक ठरेल, असे सांगितले.
यावेळी सोलापूर जिल्ह्यात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या ८० गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच शंभर टक्के गुण मिळविणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करण्यात आला. सामाजिक कार्यकर्त्या सुनंदा बुधनेर आणि अक्कलकोटचे सामाजिक कार्यकर्ते अशोक कोरे यांचाही कुलगुरूंच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
प्रास्ताविक व स्वागत यशवंत शैक्षणिक समितीचे अध्यक्ष प्रा. उत्तमराव हुंडेकर यांनी केले. शंकर कोळेकर यांनी मनोगत व्यक्त केले, तर पाहुण्यांचा परिचय डॉ. ललिता पेठकर यांनी करून दिला. सूत्रसंचालन सुनंदा बुधनेर व प्रा. शावरू जडगे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन प्रा. डॉ. नागनाथ धायगोडे, सौ. ज्योती देवकाते, सौ. वैशाली सलगर आणि नागनाथ गावडे यांनी केले. शशिकांत पैकेकरी यांनी आभार मानले.
कार्यक्रमास डॉ. शिवाजी शिंदे, डॉ. सुरेश ढेरे, प्रा. डॉ. मेटकरी, प्रा. देवेंद्र मदने, प्रा. बेडगनूर, कमलाकर पुजारी, आप्पा सलगर, शशिकांत मोटे यांच्यासह पालक, विद्यार्थी आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.