वैराग : पुणे येथे आयोजित ‘दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीज् असोसिएशन’च्या (DSTA) ७१ व्या वार्षिक अधिवेशनात व साखर प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी गौडगाव (ता. बार्शी) येथील शहाजीराव भड (एस. बी. भड) यांना साखर क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय आणि उत्कृष्ट कार्याबद्दल प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या भव्य सोहळ्याला राज्याचे माजी गृह व अर्थमंत्री जयंत पाटील, माजी मंत्री राजेश टोपे, दिलीप देशमुख, राज्याचे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते, माजी आयएएस अधिकारी डॉ. शेखर गायकवाड, बी. बी. ठोंबरे आणि आर. व्ही. कुंभार या प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते शहाजीराव भड यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
साखर उद्योगाचे भविष्य बदलण्याची गरज – जयंत पाटील यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना माजी मंत्री जयंत पाटील म्हणाले की, “साखर उद्योगाकडे केवळ साखर उत्पादन करणारा उद्योग म्हणून न पाहता ‘मल्टीप्रॉडक्ट बायोमास रिसोर्स’ म्हणून पाहण्याची आज गरज आहे. इथेनॉल, बायो गॅस, बायो-सीएनजी यांसारख्या विविध मूल्यवर्धित उत्पादनांच्या माध्यमातून या उद्योगाची आर्थिक व्यवहार्यता वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या (AI) आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि कार्यक्षमता वाढवण्यावर मोठ्या प्रमाणात भर द्यावा लागेल.”
तसेच, साखर उद्योग हे एक मोठे कुटुंब असून या उद्योगाच्या प्रगतीमध्ये ‘डीएसटीए’चे तंत्रज्ञान, संशोधन आणि मार्गदर्शन यांचे नेहमीच मोलाचे योगदान राहिले असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
बार्शी तालुक्यातील गौडगावचे सुपुत्र शहाजीराव भड यांना राज्यस्तरीय व्यासपीठावर आणि दिग्गज मान्यवरांच्या हस्ते मिळालेल्या या सन्मानामुळे गोडगावसह संपूर्ण बार्शी तालुक्यातून व परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Post Views: 7