कुर्डुवाडी – माढा तालुक्यातील मौजे भोसरे येथील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या दोन महत्त्वाच्या रस्त्यांचा राज्य शासनाच्या ग्रामीण रस्ते विकास आराखड्यात समावेश करण्यात आला असून, दोन्ही रस्त्यांना अधिकृत ग्रामीण मार्ग क्रमांक प्रदान करण्यात आले आहेत. त्यामुळे या रस्त्यांच्या डांबरीकरण, रुंदीकरण आणि मजबुतीकरणाचा मार्ग मोकळा झाला असून ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. करमाळा माढा विधानसभेचे माजी आ. संजय मामा शिंदे आणि भाजप नेते रणजीत शिंदे यांनी गेल्या अनेक वर्षापासून या मागणीला मंत्रालय स्तरावर योग्य वेळी योग्य पाठपुरावा केला होता.
शासन निर्णयानुसार बागल वस्ती (बार्शी रेल्वे लाईनजवळ) ते जगदाळे नगर, बार्शी रोड राष्ट्रीय महामार्ग ५४८-सी (जुना रा. मा. १४५) जोडणाऱ्या रस्त्यास ग्रामीण मार्ग क्र. ३५७, तर काळे वस्ती (सोलापूर रेल्वे लाईनजवळ) ते तडवळे रस्ता, इतर जिल्हा मार्ग क्र. १४ जोडणाऱ्या रस्त्यास ग्रामीण मार्ग क्र. ३५६ मंजूर करण्यात आला आहे.
हे दोन्ही रस्ते अनेक वर्षांपासून अत्यंत दुरवस्थेत होते. पावसाळ्यात चिखल, मोठमोठे खड्डे आणि पाणी साचत असल्याने शेतकरी, विद्यार्थी, वाहनचालक तसेच रुग्ण, ऊस वाहतूक यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे या रस्त्यांचा विकास आराखड्यात समावेश व्हावा, यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता.
मुंबई येथे झालेल्या बैठकीमध्ये संजय मामा शिंदे आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या चर्चा होऊन प्रलंबित राहिलेली फाईल अखेर पालकमंत्र्यांच्या टेबलावर आली. आणि काही वेळातच भोसरी गावचा प्रलंबित प्रश्न शासकीय निर्णयांमध्ये बदलला गेला.
चौकट –
” 70 वर्षात कुणाला जमले नाहीं ते करून दाखवले.”
Bया प्रक्रियेत संबंधित प्रशासकीय अधिकारी, आमचे नेते संजयमामा शिंदे, रणजित भैया शिंदे यांचे आणि कार्यालयीन कर्मचारी तसेच भाजयुमो अध्यक्ष सिद्धेश्वर बागल यांनीही मोलाचे सहकार्य केले. पालकमंत्र्यांनी न्याय दिल्याबद्दल आभार.
सौ सुलन रामदास बागल
( सदस्या भोसरे ग्रामपंचायत )
Post Views: 5