सोलापूर: क्रांती म्हणजे केवळ एका सत्तेचा अस्त आणि दुसऱ्या सत्तेचा उदय नाही. माणसाच्या विचारांमध्ये, समाजाच्या जाणिवांमध्ये आणि व्यवस्थेच्या मूल्यांमध्ये घडणारे मूलभूत परिवर्तन म्हणजे खरी क्रांती आहे. क्रांतीत अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे धैर्य, समाजाला नवा विचार देण्याची ताकद आणि राष्ट्रहितासाठी स्वतःच्या स्वार्थाचा त्याग करण्याची वृत्ती सामावलेली असते. भारतीय स्वातंत्र्यलढा हा अशाच असंख्य ज्ञात-अज्ञात देशभक्तांच्या त्यागातून उभा राहिलेला लोकलढा होता असे प्रतिपादन परभणी येथील कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख डॉ. महेश जाधव यांनी केले.
सातरस्ता मोदीखाना येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयात ऑगस्ट क्रांती दिनाच्या औचित्याने स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाचा आणि क्रांतिकारी विचारांचा वेध घेणाऱ्या विशेष आभासी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. किशोर पवार होते.
पुढे बोलताना डॉ. जाधव म्हणाले की, स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास हा राजकीय संघर्षासोबतच भारतीय समाजाच्या आत्मजागृतीचाही इतिहास आहे. तो भारतीयांच्या मनातील गुलामगिरी झुगारून देण्याचा, आत्मसन्मान जागविण्याचा आणि ‘आपले भविष्य आपण घडवू शकतो’ हा विश्वास निर्माण करण्याचा संघर्ष होता.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. किशोर पवार म्हणाले की, देशभक्ती ही आपल्या दैनंदिन आचरणातून प्रकट झाली पाहिजे. प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा, सामाजिक संवेदनशीलता आणि संविधानिक मूल्यांचा आदर ही आजच्या काळातील राष्ट्रसेवेची प्रभावी रूपे आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संतोष मारकवाड यांनी केले. तर आभार डॉ. दशरथ रसाळ यांनी मानले.
*फोटो ओळ: आभासी पद्धतीने मार्गदर्शन करताना डॉ. महेश जाधव आणि उपस्थित विद्यार्थ्यांनी*
*चौकटीतील मजकूर*
*स्वातंत्र्य हा जबाबदारीने जपण्याचा अमूल्य ठेवा*
यावेळी डॉ. महेश जाधव यांनी विद्यार्थिनींना जाणीव करून दिली की, अनेक ज्ञात-अज्ञात देशभक्तांच्या बलिदानामुळेच आज आपण मुक्तपणे विचार करतो, बोलतो आणि आपले भविष्य निवडतो. मिळालेल्या प्रत्येक स्वातंत्र्यामागे कोणाच्या तरी त्यागाची किंमत आहे. म्हणून स्वातंत्र्य हा आपल्याला वारशाने मिळालेला केवळ अधिकार नाही; तो जबाबदारीने जपण्याचा अमूल्य ठेवा आहे.