सोलापूर – माढा तालुक्यातील परिते गावाच्या पाणीपुरवठ्यासाठी शासकीय निधीतून खोदण्यात आलेली विहीरच सध्या जागेवर उपलब्ध नसल्याचे समोर आल्याने पाणीपुरवठा योजनेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. २०११ मध्ये या विहिरीसाठी शासकीय निधी खर्च करण्यात आला होता. त्यानंतर विहिरीच्या खोलीकरणासाठीही निधी खर्च झाला. मात्र, आज ही विहीर अस्तित्वात नसल्याचे सांगितले जात असल्याने संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य सविता संजय कोकाटे यांनी केली आहे.
परिते गावातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी संबंधित विहीर महत्त्वाची होती. मात्र, विहीरच उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे कोकाटे यांनी जिल्हा परिषद प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. विशेष म्हणजे, ग्रामस्थांनी यापूर्वी माढा तहसीलदार तसेच कुर्डूवाडी येथील गटविकास अधिकारी यांच्याकडे याबाबत वारंवार तक्रारी केल्या आहेत. मात्र, अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
प्रकरणाची चौकशी करून शासकीय निधीचा गैरवापर किंवा अनियमितता आढळल्यास संबंधित दोषींवर गुन्हे दाखल करावेत. तसेच परिते ग्रामस्थांचा पाणीप्रश्न तातडीने सोडवून पाणीपुरवठा पूर्ववत सुरळीत करावा, अशी मागणी सौ. सविता कोकाटे यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांच्याकडे केली आहे.
कोट
शासकीय निधी खर्च होऊनही विहीर कुठे गेली? हा प्रश्न आता केंद्रस्थानी आला आहे. विहीर खोदकाम आणि खोलीकरणासाठी झालेला खर्च, संबंधित योजनेची प्रत्यक्ष स्थिती, विहिरीचे ठिकाण तसेच त्यासंदर्भातील शासकीय नोंदी यांची सखोल तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सविता कोकाटे, जिल्हा परिषद सदस्या
चौकट
चौकशीचे प्रमुख मुद्दे
– २०११ मध्ये विहीर खोदण्यासाठी झालेला शासकीय खर्च
– त्यानंतर करण्यात आलेल्या खोलीकरणाचा खर्च
– विहिरीचे प्रत्यक्ष ठिकाण व सद्यस्थिती
– संबंधित शासकीय नोंदी व कामाची पाहणी
– तक्रारी करूनही कारवाई न झाल्याची कारणे
– दोष आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई
– परितेचा पाणीपुरवठा तातडीने पूर्ववत करण्याची कार्यवाही
Post Views: 23