सोलापूर : समाजात असलेली प्रतिमा व प्रतिष्ठा मलिन करण्याच्या उद्देशाने खोटे व बदनामीकारक आरोप केल्या प्रकरणी सोलापूर युवक राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष(अजित पवार गट) सुहास विजय कदम व सोलापूर शहर जिल्हा अध्यक्ष व पक्षाचे मुख्य प्रवक्ते उमेश सुरेश पाटील यांच्याविरुद्ध पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब रामदास गायकवाड यांनी येथील दिवाणी न्यायालयात पाच कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुहास कदम व उमेश पाटील यांनी १ जून २०२६ रोजी पक्षाच्या लेटरहेडवरून समाजात आपली प्रतिमा मलिन व्हावी व प्रतिष्ठा कमी व्हावी, तसेच जनमानसात बदनामी व्हावी, या उद्देशाने आपण भ्रष्ट अधिकारी असल्याचे आरोप करीत पोलीस उपआयुक्तांकडे लेखी तक्रार केली.
त्यानंतर १० जून २०२६ पासून पुनम गेट येथील जिल्हा परिषद कार्यालयासमोर मंडप टाकून आमरण उपोषण करण्यात आले. यावेळी आपल्यासह पोलीस हवालदार भगवान शिंदे व व राजू चव्हाण हे वसूलदार असून त्यांच्याकडे शेकडो रुपयांची मालमत्ता असल्याचे तसेच लाचलुचपत व आयकर विभागाकडून चौकशी करावी, असे आरोप सुहास कदम यांनी यावेळी केला. तसेच सुहास कदम यांनी आंदोलन स्थळी स्थानिक न्यूज चॅनेल व पत्रकारांना मुलाखती देऊन समाज, पोलीस दल, नातेवाईक, मित्र व सहकारी यांच्यामध्ये आपली पद व प्रतिष्ठा कमी व्हावी आणि प्रतिमा मलिन व्हावी, या उद्देशाने खोटे व बदनामीकारक वक्तव्य केल्याचे दाव्यात म्हटले आहे.
या आरोपांमुळे झालेल्या बदनामीपोटी सहाय्यक फौजदार बाळासाहेब गायकवाड यांनी वरिष्ठाच्या परवानगीने या दोघांविरुद्ध दिवाणी न्यायालयात विशेष अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे.
दाव्यात गायकवाड यांना पोलीस दलाकडून मिळालेली प्रशस्तीपत्रके, बक्षिसे तसेच उल्लेखनीय कामगिरीबद्दल मिळालेल्या पुरस्कारांचाही संदर्भ देण्यात आला आहे. तसेच सुहास कदम व उमेश पाटील यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यांचा संदर्भ व तपशीलही दाव्यात नमूद करण्यात आला आहे. याप्रकरणी वादीच्या वतीने ऍड. प्रवीण शेंडे हे काम पाहत आहेत.
Post Views: 11