धाराशिव : पोदार इंटरनॅशनल स्कूल, धाराशिव येथे स्कूलचे प्राचार्य डॉ. वाल्मिक सोमासे सर यांच्या मार्गदर्शनाखाली भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
स्वातंत्र्यदिनानिमित्त शाळेच्या परिसरात तिरंगी सजावट करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय सैन्यातील निवृत्त सुभेदार बाळासाहेब सूर्यभान मुरकुटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. नांदुरगा येथील ‘जीवन प्रगति विद्यालय’ आणि कळंब येथील ‘ज्ञानप्रसारक महाविद्यालय’ येथून शिक्षण पूर्ण केल्यानंतर, मुरकुटे २० एप्रिल १९९१ रोजी भारतीय लष्करात भरती झाले. त्यांनी अहिल्यानगर येथे प्रशिक्षण पूर्ण केले. आपल्या सुमारे ३० वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी अंबाला, झाशी, सुरतगड, जम्मू-काश्मीर, दिल्ली आणि पठाणकोट यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी देशसेवा बजावली. ३० एप्रिल २०१९ रोजी सुभेदार पदावरून सेवावृत्त झाल्यानंतर, सध्या ते ‘माजी सैनिक संघटना, वाशी’ चे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीमुळे या सोहळ्याला विशेष बहुमान प्राप्त झाला आहे.
कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर राष्ट्रगीत व राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीते, भाषणे, कविता तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास, स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान आणि देशाच्या प्रगतीमध्ये नागरिकांची भूमिका याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी देशाच्या एकता, अखंडता आणि प्रगतीसाठी योगदान देण्याचा संकल्प केला. शाळेचे उपप्राचार्य निलेश जाधव सर यांनी आपल्या मनोगतात स्वातंत्र्य हे केवळ अधिकार नसून त्यासोबत जबाबदारीही येते, असे सांगत विद्यार्थ्यांनी शिस्त, प्रामाणिकपणा, देशप्रेम आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांचा अंगीकार करावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन व आयोजन कला विभागाचे अर्चना जैन मॅडम व त्यांचे सहकारी, तसेच सूत्रसंचालन रजनी शेरकर मॅडम व त्यांची टीम, तसेच कार्यक्रमाधिकारी सुप्रिया राहिगुडे मॅडम व स्कूलच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांनी केले.
कार्यक्रमास पोदार प्रेपच्या मुख्याध्यापिका सौ. रेश्मा संकपाळ मॅडम, स्कूलचे व्यवस्थापकीय अधिकारी श्री जीवन कुलकर्णी सर, प्रदिप शिंदे सर, दिपक अंकुश सर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसर “भारत माता की जय” आणि “वंदे मातरम्”च्या जयघोषाने दुमदुमून गेला.
























