सोलापूर – कंदलगाव येथील राऊंड टेबल जीवन ज्योत माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेत भारताचा ८०वा स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळाचे सहसचिव प्रा. सुबोध कोळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कंदलगावच्या सरपंच शारदा कडते यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षी स्वर्गीय दी. शि. कमळे गुरुजी यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
यावेळी ध्वजारोहण, देशभक्तीपर कार्यक्रमांसह गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आणि कॉपीमुक्त अभियानाची शपथ हा कार्यक्रमाचा विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.
प्राचार्य आर. बी. यलगोंडे यांनी प्रास्ताविकातून प्रशालेच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेत आगामी काळातील विविध उपक्रमांची माहिती दिली. प्रमुख पाहुणे प्रा. सुबोध कोळी यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलच्या आहारी न जाता स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांच्या त्यागातून प्रेरणा घेऊन व्यक्तिमत्त्व घडविण्याचे आवाहन केले.
यावेळी गावातील दानशूर व्यक्ती तसेच विविध पतसंस्थांच्या सहकार्याने दहावी व बारावी परीक्षेत प्रथम तीन क्रमांक मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांनी मानवंदना, देशभक्तीपर गीते आणि कवायत सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कॉपीमुक्त अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना परीक्षेत गैरप्रकार न करण्याची शपथ देण्यात आली. त्यामुळे शैक्षणिक प्रामाणिकतेचा संदेशही या सोहळ्यातून देण्यात आला.
कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष संजय कोले, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ जोकारे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन योगेश शिंदे यांनी केले, तर आभार पर्यवेक्षक एस. बी. जमादार यांनी मानले.
Post Views: 23