सोलापूर – उत्तर सोलापूर तालुक्यातील विविध गावांमध्ये भेडसावणाऱ्या पाणीप्रश्नांकडे सोलापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी लक्ष वेधत संबंधित समस्या तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली. यासाठी उजनी कालवा विभाग क्र. ८, सोलापूरचे कार्यकारी अभियंता म्याकल यांची भेट घेऊन तालुक्यातील पाणीपुरवठा, कालव्यांमधून मिळणारे पाणी तसेच शेतकरी व नागरिकांच्या विविध अडचणी सविस्तरपणे मांडण्यात आल्या.
उत्तर सोलापूर तालुक्यातील अनेक गावांचा शेती आणि नागरिकांच्या दैनंदिन गरजांसाठी पाण्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असलेल्या पार्श्वभूमीवर पाणीप्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. गावागावातील पाणीपुरवठ्याची स्थिती, कालव्यांमधून पाण्याचे नियोजन आणि शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी याबाबत यावेळी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आल्याचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी सांगितले.
पाण्याशी संबंधित प्रश्न केवळ कागदोपत्री न ठेवता त्यावर प्रत्यक्ष कार्यवाही होऊन नागरिकांना दिलासा मिळावा, अशी ठाम भूमिका यावेळी मांडण्यात आली. विशेषतः पाण्याचे योग्य नियोजन, उपलब्ध पाण्याचा प्रभावी वापर आणि संबंधित गावांच्या गरजेनुसार आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी कार्यकारी अभियंता म्याकल यांनी मांडण्यात आलेल्या विविध प्रश्नांवर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे उत्तर सोलापूर तालुक्यातील पाणीप्रश्नांना आता काही प्रमाणात गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
यावेळी भाजपा उत्तर तालुका अध्यक्ष संभाजी दडे, भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विनायक सुतार, पंचायत समिती उपसभापती सुनील भोसले, अकोलेकाटीच्या सरपंच अंजली क्षीरसागर, गुळवंचीचे सरपंच सुनील जाधव, अरुण बारसकर, राजाराम गरड, अविनाश शिरसट आदींसह शेतकरी बांधव उपस्थित होते.
Post Views: 12