कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे प्रतिकूल सामाजिक-आर्थिक परिस्थितीवर मात करून जिद्दीने सीईटी परीक्षेत यश मिळविणाऱ्या पुनम भिम अलकुंटे या विद्यार्थिनीचा डॉ. पी. के. शहा यांच्या हस्ते करण्यात आलेला सत्कार. प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाची कास धरून मिळवलेल्या या यशाचे उपस्थितांनी कौतुक केले. पुनमच्या जिद्दीला आणि शैक्षणिक कामगिरीला प्रोत्साहन देण्यासाठी हा सत्कार करण्यात आला.
दरम्यान, स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ओडियाराज चौकातील डॉ. शहा यांच्या नेत्रचिकित्सालयात मोफत नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात विविध वयोगटांतील सुमारे ११८ नागरिकांची नेत्रतपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान आढळलेल्या नेत्रविषयक समस्यांबाबत नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पुढील उपचार, घ्यावयाची काळजी आणि आवश्यक वैद्यकीय सल्ल्याची माहितीही देण्यात आली.
स्वातंत्र्यदिनाचा उत्सव केवळ ध्वजारोहणापुरता मर्यादित न ठेवता शिक्षणाला प्रोत्साहन आणि आरोग्यसेवेची सामाजिक बांधिलकी यांची सांगड घालण्यात आली. त्यामुळे या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.
देशभक्ती, सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाव यांचा सुंदर संगम घडवून आणणारा हा स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम परिसरातील नागरिकांसाठी विशेष ठरला. यावेळी वसंतराव धोत्रे, अंकुश टकळगे, सहदेव कलपूरे, सतीश धोत्रे, विकास कलपूरे, नागनाथ ईटकर, सूरज धोत्रे, सुनील ईटकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.






















