बार्शी – शहरातील महिला, मुली, विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रमुख ठिकाणी उच्च प्रतीचे सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने बसविण्याची मागणी विरोधी पक्षनेते ॲड. नागेश अक्कलकोटे यांनी केली आहे. त्यांनी शहर पोलीस ठाणे, नगरपरिषद मुख्याधिकारी आणि तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांना याबाबत निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मागील काही महिन्यांपासून शाळा-महाविद्यालय परिसरात मुलींचा पाठलाग, छेडछाड, अल्पवयीन मुलींच्या विनयभंगाचे प्रकार, मुलींना फूस लावून पळवून नेण्याचे प्रसंग, महिलांच्या गळ्यातील दागिन्यांची चोरी, घरफोडी, बाजारपेठेत मोबाईल व दुकान चोरी तसेच मोटारसायकल चोरी यासारख्या घटना वाढत आहेत. शाळा-महाविद्यालय परिसरात ट्रिपल सीट, बिगर नंबर प्लेटची वाहने, मुलींच्या दिशेने वाहनांची रेस आणि हुल्लडबाजी याबाबतही तक्रारी येत आहेत. सायंकाळी चौक-बाजारपेठा व रहिवासी भागात तरुणांची टोळकी जमणे, मोटारसायकली आडव्या लावणे, वाढदिवसाच्या नावाखाली फटाके फोडणे, विनापरवाना डीजे वाजविणे आणि सार्वजनिक शांतता भंग करणे असे प्रकार होत आहेत. दोन गटांमधील वाद, हाणामारी व हत्यारांचा वापर यामुळेही भीतीचे वातावरण आहे.
अक्कलकोटे यांनी महाराष्ट्र शासनाच्या ‘One Camera for the City, Security for All’ उपक्रमाचा उल्लेख करत शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठा, शाळा-महाविद्यालय परिसर, बसस्थानक, प्रमुख रस्ते, संवेदनशील व गर्दीची ठिकाणे तसेच शहराच्या प्रवेश-बाहेर जाण्याच्या मार्गावर सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याची मागणी केली. यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण, संशयास्पद हालचालींवर लक्ष आणि घटना घडल्यास आरोपी शोधण्यासाठी पुरावे उपलब्ध होतील, असे त्यांनी म्हटले.
प्रमुख मागण्या-
प्रमुख चौक, बाजारपेठा, शाळा-महाविद्यालय परिसर व संवेदनशील ठिकाणी आयपी बेस्ड उच्च प्रतीचे सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने बसवावेत. प्रवेश व बाहेर जाणाऱ्या मार्गावर नंबर प्लेट स्पष्ट टिपणारे एएनपीआर कॅमेरे बसवावेत. शाळा-महाविद्यालय परिसरात विशेष सुरक्षा कॅमेरे व थेट निरीक्षण व्यवस्था करावी. सीसीटीव्हीचे नियंत्रण पोलीस समन्वयाने केंद्रीकृत नियंत्रण कक्षातून करावे. बाजारपेठ व गर्दीच्या ठिकाणी महिला सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था करावी. बिगर नंबर प्लेट वाहने, ट्रिपल सीट, बेदरकार वाहनचालक आणि छेडछाड करणाऱ्यांवर विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करावी. विनापरवाना डीजे, फटाके, हुल्लडबाजी व शांतता भंग करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी. संवेदनशील ठिकाणी नियमित पोलीस गस्त वाढवावी. कॅमेऱ्यांची नियमित देखभाल करून २४ तास कार्यरत ठेवावेत. फुटेज किमान ३० दिवस स्टोअर करून पोलीस तपासासाठी उपलब्ध ठेवावे.
पोलीस ठाणे, नगरपरिषद आणि जिल्हा प्रशासनाने संयुक्तपणे व्यापक सीसीटीव्ही नेटवर्क उभारून त्याचे नियंत्रण व देखभाल यंत्रणा निर्माण करावी, अशी मागणी अक्कलकोटे यांनी केली आहे. याबाबत ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक (सोलापूर ग्रामीण) आणि पोलीस उपविभागीय अधिकारी (बार्शी) यांनाही प्रत पाठविण्यात आल्या आहेत.
Post Views: 17