बार्शी – लोकसहभागातून कोणतीच गोष्ट अशक्य नाही, याचे उत्तम उदाहरण म्हणजे बार्शी तालुक्यातील श्रीपतपिंपरीचे ग्रामस्थ व लोकसेवा विद्यालयातील शिक्षकांच्या सहकार्याने शाळेतील विद्यार्थ्यांसाठी १ लाख रुपये किंमतीचा आर. ओ. प्लांट बसवला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शुद्ध पाणी पिण्याची सोय झाली आहे.
क्रांती दिनाचे औचित्य व श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त लोकसेवा विद्यालय, श्रीपतपिंपरी येथे ग्रामस्थ व शिक्षकांच्या संयुक्त विद्यमाने लोकवर्गणीतून विद्यार्थ्यांसाठी १ लाख रुपये किंमतीचा आर. ओ. प्लांट उभारला आहे.
या आर. ओ. प्लांटमुळे शाळेच्या विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांचे आजारी पडण्याचे प्रमाण कमी होऊन शालेय उपस्थितीसह त्यांच्या आरोग्यासाठी फायदा होणार आहे. सरपंच राम ताकभाते व उपसरपंच शाहू घाडगे यांच्या सूचनेनुसार आर. ओ. प्लांटचे उद्घाटन प्रशालेतील गुणवंत विद्यार्थिनींच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी मनोगतातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे योगदान तसेच कर्मवीर लोहोकरे गुरुजींच्या महान कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष विनायकराव गरड, सचिव पंडितराव लोहोकरे, संचालक मंडळ, अन्य संस्था पदाधिकाऱ्यांनी तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक विलास लोहोकरे यांनी आर.ओ. प्लांटसाठी सहकार्य करणाऱ्या
ग्रामस्थांचे आभार मानले आहेत. सूत्रसंचालन शिक्षक तानाजी लोंढे यांनी केले.
चौकट
श्रीपत पिंपरी ग्रामस्थ व शाळेच्या शिक्षकांनी लोकवर्गणीतून। विद्यार्थ्यांसाठी उभारलेला आर. ओ. प्लांट सामाजिक बांधिलकीचे एक उत्तम उदाहरण आहे. अन्य गावकऱ्यांनी ही पिपरी ग्रामस्थांचा आदर्श घ्यावा. शाळा, संस्था योगदानासाठी लोकसहभाग खूप महत्त्वाचा आहे. लोकसहभामुळेच कर्मवीर लोहोकरे गुरुजींनी १९४३ साली लावलेल्या छोट्या रोपट्याचे आज वटवृक्षात रुपांतर झाले आहे.
– पंडितराव लोहोकरे, सचिव,
श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, गौडगांव.
Post Views: 19