सोलापूर : महापालिकेच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, जीएसटी अनुदान आणि डीसीपीएस निधीची एकूण ३५ कोटी ५० लाख रुपयांची रक्कम एयू स्मॉल फायनान्स बँकेत मुदतठेवीत गुंतविण्यास मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती महापालिका स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते यांनी दिली.
सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा शुक्रवारी सायंकाळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात सभापती रंजीता चाकोते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेत शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, निधी गुंतवणूक आणि पर्यावरण संवर्धनाशी संबंधित पाच विषयांना मान्यता देण्यात आली. महापालिकेच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी – १८ कोटी रुपये, जीएसटी अनुदान – १० कोटी रुपये आणि डीसीपीएस निधी ७ कोटी ५० लाख रुपये असे एकूण ३५ कोटी ५० लाख रुपयांची रक्कम एयू स्मॉल फायनान्स बँकेत मुदतठेवीत गुंतविण्यास मंजुरी देण्यात आली. मुदतठेवीसाठी महापालिकेने संकेतस्थळावर जाहीर प्रसिद्धी देऊन राष्ट्रीयीकृत तसेच खासगी बँकांकडून ई-मेलद्वारे व्याजदर मागविले होते. प्राप्त दरपत्रकांमध्ये एयू स्मॉल फायनान्स बँकेने वार्षिक ७.२० टक्के इतका सर्वाधिक व्याजदर दिला. त्यामुळे ३५ कोटी ५० लाख रुपयांची रक्कम या बँकेत मुदतठेवीत ठेवण्यास स्थायी समितीने मान्यता दिली. महापालिका आयुक्तांकडून
हे प्रकरण स्थायीकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आले होते.
महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान अभियानांतर्गत प्रभाग क्रमांक २२ मधील लहान इरण्णा वस्ती आणि लिमयेवाडी येथील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरीवस्ती सुधार योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक ५ मधील चार ठिकाणी रस्त्यांचे डांबरीकरण करण्यास मान्यता देण्यात आली.
महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान अभियानाच्या जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक ८ मधील राजेंद्र चौक, बंडा घर ते कदम घर आणि परिसरात पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन टाकण्याच्या कामासाठी १७ जुलै २०२६ रोजी देण्यात आलेल्या वर्कऑर्डरची माहिती सभेत घेण्यात आली असल्याचे सभापती रंजीता चाकोते यांनी सांगितले.
Post Views: 57