सोलापूर- यू.ई.एस. महिला महाविद्यालय, सोलापूर येथील फारसी विभागाच्यावतीने महाविद्यालयात प्रथमच ‘फारसी साहित्य मंडळा’चे उद्घाटन तसेच प्रसिद्ध लेखिका डॉ. सुमय्या बागबान यांच्या ‘फारसी साहित्य परे’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमात फारसी भाषा व साहित्याचे महत्त्व, त्याचा प्रचार-प्रसार तसेच विद्यार्थिनींमध्ये साहित्यिक अभिरुची निर्माण करण्यावर विशेष भर देण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. झैनब नाईब होत्या. अखिल भारतीय उर्दू साहित्य संमेलन सोलापूरचे सदस्य रफीक खान यांनी प्रमुख पाहुणे म्हणून तर एम.ए. पांगल अँग्लो-उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, सोलापूरचे प्राचार्य डॉ. हारून रशीद बागबान हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
फारसी विभागाच्या प्रा. डॉ. सुमय्या बागबान यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून त्यांचा परिचय करून दिला.
‘फारसी साहित्य परे’ या ग्रंथावर भाष्य करताना प्रा. डॉ. मोहम्मद शफी चोबदार यांनी लेखिकेच्या शैक्षणिक व साहित्यिक प्रयत्नांचे कौतुक केले आणि ग्रंथाचे महत्त्व व उपयुक्तता स्पष्ट केली. फारसी साहित्याच्या अध्ययनामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात तसेच भारतीय उपखंडाच्या समृद्ध साहित्यिक व सांस्कृतिक परंपरेची ओळख होते, असे त्यांनी नमूद केले.
डॉ. हारून रशीद बागबान यांनी डॉ. सुमय्या बागबान यांचे ग्रंथनिर्मितीबद्दल अभिनंदन करून त्यांना प्रोत्साहन दिले. आपल्या भाषणात त्यांनी, “योग्य मार्गदर्शक मिळाल्यास सर्जनशील व्यक्तीला योग्य दिशा मिळते,” असे प्रतिपादन केले. फारसी भाषा व साहित्याचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी विद्यार्थिनींनी फारसी साहित्याचे मनापासून अध्ययन करावे आणि साहित्यिक उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. झैनब नायब यांनी फारसी विभागाच्या या उपक्रमाचे कौतुक केले. महाविद्यालयात प्रथमच ‘फारसी साहित्य मंडळा’ची स्थापना होणे ही विद्यार्थिनींसाठी महत्त्वपूर्ण शैक्षणिक व साहित्यिक संधी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच डॉ. सुमय्या बागबान यांचे ग्रंथप्रकाशनाबद्दल अभिनंदन करून अशा उपक्रमांमुळे विद्यार्थिनींच्या सर्जनशील क्षमतेला, वाचनसंस्कृतीला आणि साहित्यिक जाणिवेला चालना मिळते, असे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमास डॉ. रफीक खान, प्रा. डॉ. मोहम्मद शफी चोबदार, डॉ. हारून रशीद बागबान, डॉ. अमर दीक्षित, प्रा. समीना सैयद, प्रा. सफदर बागबान यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. सफदराआरा चोबदार यांनी केले. कार्यक्रमाच्या संयोजिका डॉ. सुमय्या बागबान यांनी आभार मानले.



















