जेऊर – उमरड (ता.करमाळा) येथे गेल्या ३२ वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेल्या हरिनाम सप्ताहाची यंदा भक्तिमय वातावरणात सांगता झाली. सात दिवस चाललेल्या या सप्ताहामुळे संपूर्ण गावात धार्मिक व आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते.
सप्ताहादरम्यान दररोज पहाटे काकडा, ज्ञानेश्वर पारायण, सायंकाळी रामकथा व हरिपाठ, तसेच रात्री समाजप्रबोधनपर कीर्तन सेवा आयोजित करण्यात आली. दररोज संध्याकाळी संपूर्ण गावकऱ्यांसाठी भोजनाची पंगत ठेवण्यात आली होती.
सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी गावातून भक्तिमय फेरी काढण्यात आली. त्यानंतर काल्याचे कीर्तन सेवा संपन्न झाली. यावेळी भाविक व ग्रामस्थांसाठी भोजनाची पंगत आयोजित करण्यात आली.
यंदा प्रथमच रक्तदान शिबिर
धार्मिक उपक्रमासोबत सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने यंदा प्रथमच सप्ताहाच्या निमित्ताने रक्तदान सेवेचे आयोजन करण्यात आले. बार्शी येथील श्री भगवंत ब्लड सेंटर यांच्या माध्यमातून रक्तसंकलन करण्यात आले. या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तब्बल १०० जणांनी रक्तदान केले. विशेष म्हणजे रक्तदानामध्ये महिलांचाही मोठा सहभाग राहिला.
धार्मिक कार्याला सामाजिक उपक्रमाची जोड देत रक्तदानासारखा स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल आयोजकांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. संपूर्ण सप्ताहाचे नियोजन संयोजक टीमने योग्य पद्धतीने केल्याने सर्व धार्मिक व सामाजिक कार्यक्रम उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडले.
Post Views: 9