बार्शी – तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक २४९/२०२६ मध्ये आरोपी चांगदेव पिराजी दळवी (रा. खांडवी, ता. बार्शी) व गणेश श्रीहरी कदम (रा. सरणवाडी, ता. परांडा) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२), ३१६(५), ३१८(४), ३(५) तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियमाच्या कलम ३ व ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर रेशन तांदूळ व इतर धान्याच्या कथित अपहार प्रकरणात बार्शी न्यायालयाने दोन्ही आरोपींचा जामीन अर्ज मंजूर करुन त्यांची मुक्तता करण्याचे आदेश दिले.
प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी रेवती बागडे यांनी दोन्ही आरोपींना प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या जामीन मुचलका व योग्य जामीनदाराच्या अटीवर जामीन मंजूर केला.
या गुन्ह्याची हकीकत अशी की, सदर प्रकरणात पोलिसांनी घटनास्थळी गहू, तांदूळ व उडीदने भरलेली वाहने आढळून आली व त्यांची तपासणी केली. या कारवाईत १०,६५० किलो गहू, ८,४५० किलो तांदूळ व २०० किलो उडीद तसेच संबंधित वाहने असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणात आरोपींच्यावतीने ॲड. एस. व्ही. इनामदार यांनी प्रभावीपणे युक्तिवाद करत आरोपींची भूमिका, तपासाची स्थिती याबाबत न्यायालयाचे लक्ष वेधले. बचाव पक्षाचा केलेला युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने दोन्ही आरोपींचा जामीन मंजूर केला.
या प्रकरणात आरोपींच्यावतीने ॲड. एस. व्ही. इनामदार यांनी तर सरकार पक्षातर्फे ॲड. आर. एम. सोनवणे यांनी काम पाहिले.